पोस्टातर्फे अक्षयच्या वडिलांना धनादेश सुपूर्द; जीवन विमाच्या माध्यमातून मिळाले २० लाख रुपये
By सचिन सागरे | Published: June 3, 2024 05:24 PM2024-06-03T17:24:04+5:302024-06-03T17:25:56+5:30
जानेवारी महिन्यात अक्षयचा भातसा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला.
सचिन सागरे, कल्याण : नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू झालेल्या अक्षय भांडे (२८, रा. कळवा) यांच्या कुटुंबियांना कल्याण मुख्य पोस्ट कार्यालयाच्या वतीने जीवन विम्याची २० लाख चार हजार रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे सोमवारी सुपूर्द करण्यात आली.
जानेवारी महिन्यात अक्षयचा भातसा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. त्याने हयातीत असताना भारतीय डाक विभागाचा २० लाख रुपयांचा ‘पोस्टल लाइफ इन्शुरन्स’ विमा ऑगस्ट २०२३ मध्ये घेतला होता. विमा काढून केवळ चार महिने झाले होते. अक्षयने २५ हजार पाचशे रुपयांचे पाच हप्ते भरले होते. विमा घेताना अक्षयने वडील प्रवीण यांना नामनिर्देशित केले होते. अक्षयच्या अपघाती निधनानंतर प्रवीण यांनी फेब्रुवारीमध्ये विम्यासाठी दावा केला. कल्याण शहर मुख्य टपाल कार्यालयाकडे जमा केला. डाक विभागाने सदरहू दाव्याची आवश्यक चौकशी व योग्य कागदपत्राची पूर्तता करून घेतली. पोस्टल लाइफ इन्श्युरन्स विभाग प्रमुख अदिती जोशी व कल्याण सिटी हेड ऑफिस पोस्ट मास्तर अशोक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण यांना २० लाख चार हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
कमी कालावधीत विमा हप्ते भरून देखील नवी मुंबई क्षेत्रीय कार्यालय यांनी दाव्याची पूर्तता करून दिल्याबद्दल प्रवीण यांनी भारतीय डाक विभागाचे आभार मानले.
भारतीय डाक विभागातर्फे शहरातील तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांसाठी अतिशय अल्प दारात विमा उपलब्ध करून दिला जातो. सदर विम्याचा विमाधारकांना मुदती अंती जास्तीत जास्त लाभ देणे हा मुख्य उद्देश आहे. पण या कालावधीत काही बरेवाईट झाल्यास विमाधारकांच्या कुटुंबियांना नक्की याचा लाभ मिळत असल्याचे पोस्ट मास्तर अशोक सोनावणे यांनी सांगितले.