मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राने खाल्ला चहा-पाव, गणेश दर्शनानंतर पहाटेची पेटपूजा
By मुरलीधर भवार | Published: September 5, 2022 06:01 PM2022-09-05T18:01:39+5:302022-09-05T18:07:43+5:30
गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घ्यावे अशी मागणी सगळ्य़ाच कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
कल्याण - ठाणे जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल अंबरनाथपासून गणेश दर्शन करण्यास सुरुवात केली. त्यांचा हा कार्यक्रम पहाटेपर्यंत चालला. त्यानुसार, आज पहाटे चार वाजता खासदार शिंदे यांनी चहासह कल्याणच्या दूधनाक्यावरील मलई पावावर ताव मारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड केल्यावर ते मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचे खासदार सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही राजकारणात आघाडी घेतली आहे.
गणेशोत्सवात मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घ्यावे अशी मागणी सगळ्य़ाच कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. ठाण्यातील नाकती यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांनी गणेश दर्शन घेतले. तीच मागणी कल्याण डोंबिवली परिसरातून होत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांना सगळ्य़ाच कार्यकर्त्यांच्या घरी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे खासदार शिंदे यांनी त्यांच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढत काल दुपारी अंबरनाथपासून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणेश दर्शन घेतले. त्यांचा हा कार्यक्रम पहाटे चार वाजता शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्या घरच्या गणेश दर्शनानंतर संपला. मात्र, पहाटे चार वाजता काय खाणार. त्यांनी पाटील यांच्या घरी चहा घेत कल्याणचा प्रसिद्ध मलई पाव मागविला. त्यावर त्यांनी चांगलाच ताव मारला. बोलता बोलता ते बोलून गेले की, आणखीन दोन तासांनी इडली खावी लागेल. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावेळी डोंबिवलीचे राजेश मोरे, राजेश कदम आदी उपस्थित होते.