रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:40 PM2021-07-22T12:40:00+5:302021-07-22T12:41:13+5:30
Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा
कल्याण: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यातच, तीन दिवसापासून कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून ठिय्या आंदोलन केलं.
आज दुपारी दोन तास कोसळलेल्या पावसाने कल्याण-मलंग रोड वरील आडवली गावातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलं होतं. तर काही चाळीमध्ये देखील पाणी शिरलं. पावसाने आधीच जनजीवन विस्कळीत झालंय, त्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. आठवड्याभरात रस्त्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करू, असा इशारा देत कल्याण ग्रामीणमधील आडवली गावात नागरिकांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केलं.
यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पालिकेचा निषेध नोंदवण्यात आला. तसेच, आडवली गावात नालाच नसल्याने अशी परिस्थिती उदभवत आहे. येत्या आठवडाभरात जर 27 गावांमधली रस्त्यासह नाल्याची काम सुरू केले नाही तर सर्व रस्ते बंद करून रास्तारोको करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला.