"नागरिकांना पाच दिवस पाणी मिळत नाही"; मंत्री रविंद्र चव्हाण संतापले...
By मुरलीधर भवार | Published: September 26, 2022 09:32 PM2022-09-26T21:32:51+5:302022-09-26T21:33:33+5:30
डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
डोंबिवली : पाच दिवस नागरीकांना पाणी मिळत नाही. केडीएमसीने टँकरही बंद केले. हे ऐकून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसीचे नियोजन पूर्णपणे ढासळले आहे. अधिकाऱ्यांवर प्रशासनाच्या प्रमुखाचा धाक राहिला नाही. लवकरात लवकर बैठक घेऊन पाणी टंचाईची समस्या दूर करणार असे आश्वासन त्यांनी नागरीकांना दिले आहे. डोंबिवलीतील दावडी परिसरात पाणी टंचाई असल्याने काही नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांना काही दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी धारेवर धरले होते. रखडलेल्या विविध विकास कामांसंदर्भात भाजप नेत्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांच्या सुस्त कारभार पाहून भाजप नेते संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांना नागरीकांची कामे करण्याची ताकीद दिली गेली. आज डोंबिवली पूर्व भागातील दावडी परिसरातील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि स्थानिक नागरीकांनी मंत्री चव्हाण यांची भेट घेतली.
जालिंदर पाटील यांनी सांगितले गेल्या अनेक दिवसांपासून दावडी परिसरात तीव्र पाणी टंचाई आहे. पाच पाच दिवस पाणी येत नाही. पाण्यासाठी महिलावर्गाला वणवण फिरावे लागते. आम्ही मंत्री चव्हाण यांची भेट घेण्यासाठी आलो आहे. ही समस्या सोडविली पाहिजे. नागरीकांची ही समस्या ऐकून मंत्री चव्हाण हे संतप्त झाले. या संदर्भात वेळोवेळी सांगितले गेले आहे. महापालिकेचे नियोजन ढासळले आहे. प्रशासन प्रमुखाचा अधिकारी वर्गावर धाक नाही. मंत्री चव्हाण यांनी प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांचाच उल्लेख केला. मात्र त्यांचा नामोल्लेख करणो टाळले. यासंदर्भात लवकरात लवकर अमृत पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार आणि प्रशासन यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविणार असल्याचे आश्वासन मंत्री चव्हाण यांनी दिले आहे.