कल्याण: डोंबिवलीमधील १५६ कारखाने स्थलांतरी करण्याचा निर्णयाचे नागरीकांकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 06:47 PM2022-02-02T18:47:19+5:302022-02-02T18:49:15+5:30
या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कल्याण- डोंबिवलीतील रासायनिक, अतिधोकादायक, धोकादायक १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय एमआयडीसीच्या संचालक मंडळात आज घेण्यात आला आहे. या निर्णयाचे नागरीकांनी स्वागत केले असून केवळ हा निर्णय कागदावर राहू नये. त्याची अंमलबजावणीही केली जावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे.
डोंबिवली औद्योगिक परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे या ठिकाणचे नागरीक त्रस्त आहेत. डोंबिवलीत प्रदूषणामुळे हिरवा पाऊस पडला आहे. रस्ता गुलाबी झाला आहे. तसेच रासायनिक कंपन्यांत स्फोट झाला आहे. प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर एका कंपनीला भीषण आग लागली होती. २०११ पासून आजर्पयत घडलेल्या घटनांमध्ये ३० जणांचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्य़ा घटनांच्या पाश्र्वभूमीवर अतिधोकायक आणि धोकादायक रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्यात यावेत. जे नागरी वस्तीला लागून आहेत असा मुद्दा समोर आला होता. एमआयडीसीच्या संचालक मंडळाने आज कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतल्याने जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी त्याचे स्वागत केले आहे. घेतलेला निर्णय केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केली जावी याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले आहे.
प्रदूषणामुळे डोंबिवली एमआयडीसीतील एक रस्ता गुलाबी झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाहणीकरीता आले होते. त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील होते. त्यानंतर अग्नीशमन दल, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक सव्रेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फेब्रुवारी ते मार्च २०२० मध्ये ३०२ कारखान्यांचे सव्रेक्षण करण्यात आले होते.३८ कारखान्यांमध्ये अनियमीतता आणि त्रूटी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोना प्रादूर्भाव सुरु झाल्याने पुढील कारवाईस ब्रेक लागला होता. आत्ता १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय त्याच सव्रेक्षणाच्या आधारे घेण्यात आला असावा असे सांगण्यात येत आहे.