"BJP आमदारांची नार्को टेस्ट नव्हे, तर सायको टेस्ट करा"; शिवसेना-भाजपमध्ये शिमगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:57 AM2023-09-19T06:57:50+5:302023-09-19T06:58:15+5:30
‘आम्हाला गुंड म्हणणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे’
कल्याण - कल्याणमध्ये शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपमध्ये गणेशोत्सवात पुन्हा शिमगा सुरू झाला आहे. धनुष्यबाणावर टीका करू नका. आम्हाला गुंड म्हणणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहे, असे म्हणत शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका केली. घरोघरी गणरायाचे आगमन होत असताना दाेन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
भाजपच्या पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेवर टीका केली होती. या टीकेला महेश गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कुठे अन्याय होत असेल तर षंढ होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणविणाऱ्या आमदारांच्या विरोधातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या दोन मुलांना पोलिस संरक्षण आहे, भाजप आमदारांची नार्को टेस्ट नव्हे, तर सायको टेस्ट करा, अशी टीका शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर केली.
महेश गायकवाड काही कागद घेऊन येतात. तो पुरावा होत नाही. त्यांची ही बडबड केवळ बातम्यांमध्ये राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांची टीका म्हणजे ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ असाच प्रकार आहे, अशी टीका भाजप पदाधिकारी संदीप तांबे यांनी केली.
शिवसेना शहरप्रमुख गायकवाड यांनी दिलेल्या प्रत्युत्तराला तांबे म्हणाले, विनापुरावे आरोप करायचे. चार कागद दाखविले म्हणजे पुरावे होत नाही. ज्या कामाविषयी ते आरोप करीत आहेत. ते काम तिसगाव येथे नाही. माजी नगरसेवक गायकवाड यांना ते काम नक्की कुठे आहे हेच माहिती नाही. उगाच बडबड करून बातम्यांमध्ये राहणे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका तांबे यांनी केली.