दिवा स्थानकात प्रवाशांना बंद वॉटर वेंडिंग मशीन सेवा बंद!
By अनिकेत घमंडी | Published: September 21, 2022 04:35 PM2022-09-21T16:35:12+5:302022-09-21T16:35:40+5:30
मध्य रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशीनला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानकात मात्र मशीनला भरघोस प्रतिसाद मिळत होता.
डोंबिवली: रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्वस्त दरात पाणी पिण्यास मिळावं, यासाठी काही वर्षांपूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने बहुतांशी स्थानकात वॉटर वेंडिंग मशीन उभ्या केल्या होत्या. दिवा स्थानकातही तशी सेवा सुरु झाली होती, मात्र कोरोनापासून ती सेवा बंद पडली असून आताही सर्व नियम शिथिल झाले असतानाही ती सुरू झालेली नाही.
मध्य रेल्वे मार्गावर वॉटर वेंडिंग मशीनला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी दिवा स्थानकात मात्र मशीनला भरघोस प्रतिसाद मिळत होता. त्या काळात दिवा शहरात पाण्याची भीषण टंचाई असताना या वॉटर वेंडिंग मशीन खऱ्या अर्थाने दिव्यातील रेल्वे प्रवाशांना तथा इथल्या सामान्य नागरिकांना उपयुक्त अशा ठरत होत्या. अगदी कमी भावात पाणी मिळत असल्याने बहुतांश प्रवासी घरातून तीन-चार बॉटल सोबत घेऊन कामावरून जात व येता वेळेस त्या स्थानकातून भरून घेत होते. परंतु सदरचा कंत्राट ज्या ठेकेदारांना देण्यात आला होता. त्यांनी वीज बिल व इतर बिलं थकवल्याने या सर्व मशीन मागील तीन ते चार वर्षापासून बंद अवस्थेत फलाटांवर मध्यभागी धुळखात उभ्या आहेत.
दिवा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील प्रचंड वाढली आहे. सकाळी गर्दीच्या वेळी या स्थानकात फलाटांवर उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नसते. यामुळे बऱ्याच वेळा प्रवाशांना अपघाताला देखील सामोरे जावे लागते. अशा गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या ह्या वॉटर वेंडिंग मशीन तात्काळ कार्यान्वित कराव्यात अन्यथा प्रवाशांना अडचण ठरत असलेल्या या वॉटर वेंडिंग मशीन फलाटांवरून काढून टाकाव्यात किंवा अन्यत्र हलवाव्यात अशी मागणी दिवेकर रेल्वे प्रवाशांतर्फे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत म्हणाले.
या प्रकल्पाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, समस्या आली असून ती यंत्रणा बंद आहे, ती पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असून त्याची देखभाल जबाबदारी कोणती सामाजिक संस्था करते का? याबाबत देखील प्रयत्न सुरू आहेत असेही सांगण्यात आले.