फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:23 PM2021-09-07T17:23:24+5:302021-09-07T17:24:44+5:30
विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण.
"कल्याण-स्कायवॉक फेरीवाला मुक्त हा महत्त्वाचा विषय आहे. ठाण्यात मध्यंतरती जी घटना घडली. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलीस देखील आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्याच्या बाबतीत दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायदा राबवावा लागेल," असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार केले.
कल्याणडोंबिवली महापालिकेच्या विविध विकास कामांचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास ऑनलाईनद्वारे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक, विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजप आमदार चव्हाण यांनी व्यथा मांडली. "मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. निधी द्यावा. मंदिरे उघडी करावी," असे ते म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्याची मंदिरे उभारणे गरजेचे आहे." चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सुद्धा घोषणा देतो. मात्र ज्या भारत मातेच्या घोषणा दिल्या जातात. त्याच भारत मातेची मुले सोयी सुविधांपासून वंचित राहणार असतील तर केवळ घोषणा देऊन काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला. कल्याण डोंबिवलीचा विकासासाठी काय हवे आहे. एकदा या आणि बसा पूल, रस्ते, रुग्णालय काय हवे आहे. जनतेच्या सोयी सुविधांसाठी सर्व काही तयारी करण्याची तयारी आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.
६५०० कोटीचा बॅकलॉग कशामुळे राहिला..?
आमदार चव्हाण यांनी बॅकलॉगचा मुद्दा यादरम्यान उपस्थित केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते. हा बॅकलॉग कशामुळे राहिला असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला.
कोपर रेल्वे उड्डाणपूल, रुक्णीबाई रुग्णालय प्राणवायू प्रकल्प, सावळाराम क्रीडा संकुल प्राणवायू प्रकल्प, शास्त्रनगर रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, नागरी आरोग्य केंद्र, जैव विविधता उद्दान, महिलांसाटी तेजस्वीनी बस आणि अग्नीशमन केंद्र या कामाचे लोकार्पण करण्यात आले.