मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकणार - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:28 PM2024-03-03T22:28:01+5:302024-03-03T23:32:52+5:30
डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीने राज्यात पायाभूत सुविधांचे काम देशात नंबर वन आहे. तर परदेशी गुंतवणूक आणि जीडीपीमध्ये देखील महाराष्ट्र नंबर वन वर आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज्यातून लोकसभेच्या 45 प्लस जागा जिंकून देण्यात आणि 'अब की बार 400 पार' करण्यासाठी महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त इंदुरानी जाखड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. सर्वसामान्य नागरिकांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, हे धोरण अवलंबिण्यात आले आहे. आपले सरकार आल्यापासून गेल्या दीड दोन वर्षात राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक चांगली व सक्षम करण्यात येत आहे.
महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.