पहलगाम दहशतवादी हल्ल्यात रेल्वे अभियंता अतुल यांच्या मृत्यूने सहकारी शोकाकूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:20 IST2025-04-24T06:20:37+5:302025-04-24T06:20:59+5:30
मोने कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला गेले होते.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात रेल्वे अभियंता अतुल यांच्या मृत्यूने सहकारी शोकाकूल
मुंबई - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता अतुल मोने यांचा मृत्यू झाला. ते परळ वर्कशॉपच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यरत होते. मोने यांच्या जाण्याने त्यांचे सहकारी शोकाकूल आहेत.
अतुल मोने रेल्वेत २००० साली कनिष्ठ अभियंता पदावर रूजू झाले होते. त्यांनी जवळपास २५ वर्षे रेल्वेत सेवा बजावली आहे. परळ वर्कशॉपमध्ये त्यांचा जवळपास ३० जणांचा ग्रुप होता. मोने अत्यंत मनमिळाऊ आणि कामात एकनिष्ठ असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. पर्यटनाची आवड असलेले अतुल यांचा दहशतवादी हल्ल्यात बळी जाईल, असे वाटले नव्हते, असे त्यांचे सहकारी म्हणाले. मोने कुटुंबीयांसह पर्यटनासाठी जात. काही दिवसांपूर्वी ते पत्नी आणि मुलीसह काश्मीरला गेले होते.
अतुल आणि मी एकाच ठिकाणी काम करतो. तो माझ्या अगदी जवळचा होता. जेवण, चहा-पाणी रोज एकत्रच करत होतो. आता दुपारच्या चहासाठी कोणाला कॉल करू? - तमिला रसन, सहकर्मी
अतुलबद्दल अशी दु:खद बातमी येईल, असे वाटले नव्हते. त्याला पर्यटनाची आवड होती. तो फिरायला तर गेला परंतु आता परत येणार नाही, याची कल्पना करवत नाही आहे. - राजेश नाडल, सहकर्मी
अतुल माने काश्मीरला जाताना येतो असे सांगून गेले परंतु ते आता कधीच परत येणार नाहीत, या शब्दांत त्यांच्या शोकाकुल सहकाऱ्यांनी आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.