कल्याण बाजार समितीमधील फूल मार्केटमधील विक्रेत्यांकडून कोण करतोय वसूली?
By मुरलीधर भवार | Published: May 23, 2023 05:57 PM2023-05-23T17:57:53+5:302023-05-23T17:58:20+5:30
बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फूल बाजारातील विक्रेत्यांकडून १५०० रुपयांची वसूली केली जात आहे. या वसूली प्रकरणी बाजार समितीने हात वरती केले आहेत. त्यामुळे विक्रेत्यांकडून वसूली कोण आणि कशाची करतोय असा संतप्त सवाल फूल विक्रेत्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणी एका फूल विक्रेत्या महिलने बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे.
कल्याण बाजार समितीच्या आवारात फूल मार्केट आहे. या फूल मार्केटमधील शेड धाेकादायक झाल्याने त्याठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम करण्याकरीता बाजार समितीच्या वतीने महापालिकेकडे प्रस्ताव मांडला होता. बाजार समितीकडून फूल विक्रेत्यांच्या शेड तोडण्यास विक्रेत्यांचा विरोध होता.
उच्च न्यायालयाने शेड तोडण्याचे आदेश दिल्याने बाजार समितीने सप्टेंबर २०२२ मध्ये शेड तोडण्याची कारवाई केली. तोडण्यात आलेल्या शेडमधील विक्रेत्यांना आवारात तात्पुरत्या शेडची पर्याची केली आहे. मात्र विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, बाजार समितीने विक्रेत्यांकडून वर्षभराचे भाडे घेतले आहे. वर्षभराचे भाडे हे १४ हजार रुपये आहे. भाडे घेण्याचा अधिकार बाजार समितीचा आहे. मात्र त्या व्यतिरिक्त विक्रेत्यांकडून काही मंडळी दीड हजार रुपये वसूल करीत आहे. या दीड हजार रुपयांची पावती विक्रेत्यांनी मागितली असता पावती देण्यास नकार दिला जात आहे. या प्रकरणी एका फूल विक्रेत्या महिलेने वसूली करणाऱ्याकडे पावतीची मागणी केली असता तिला शिवीगाळ करुन तिचा फूलाचा बाकडा फेकून दिला. या महिलेने बाजारपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी बाजार समिती प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासनने हात वरती केले आहे. प्रशासनाकडून ही वसूली केली जात नसेल तर अशी बेकायदेशीर वसूली कोण करतोय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई होणे अपेक्षित आहे अशी मागणी फूल विक्रेत्यांनी केली आहे. फूल मार्केटमधील शेड तोडल्याचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ जून रोजी हाेणे अपेक्षित आहे.