जागावाटपात डावलल्याने जिल्हा काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
By प्रशांत माने | Published: October 27, 2024 05:34 PM2024-10-27T17:34:28+5:302024-10-27T17:34:51+5:30
अदयाप वेळ गेलेली नाही, पक्षाने विचार करावा - सचिन पोटे
प्रशांत माने/कल्याण लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: जागा वाटपावरून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या इथल्या काँग्रेसमध्ये मोठी नाराजी पसरली असून प्रमुख पदाधिका-यांसह १२५ जणांनी रविवारी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. ठाणे जिल्हयातील भिवंडी वगळता उर्वरित ठिकाणी काँग्रेसचा पंजा हद्दपार करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत केला.
डोंबिवलीत दीपेश म्हात्रे, कल्याण पूर्वेत धनंजय बोडारे, कल्याण पश्चिममध्ये सचिन बासरे तर कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर या चारही मतदारसंघात उध्दवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. कल्याण पूर्व-पश्चिम मतदारसंघ मिळावा अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. परंतू चारही मतदारसंघात उध्दवसेनेचे उमेदवार घोषित झाल्याने काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे.
लोकसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिकपणे महाविकास आघाडीचे काम करत आघाडीचा धर्म पाळला आहे. विधानसभा निवडणुकीत कोकण आणि ठाणे जिल्हयात काँग्रेसला पोषक वातावरण असतानाही काँग्रेसला एकही जागा सोडली नसल्याने आम्ही सर्व जण आमच्या पदांचे सामूहिक राजीनामे देत असल्याचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे म्हणाले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असून पक्षश्रेष्ठींनी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याची आग्रही भूमिका घ्यावी याकडेही पोटे यांनी लक्ष वेधले.
पूर्व-पश्चिम मतदारसंघ काँग्रेसला पूरक
कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला पूरक असतानाही कोणताही विचार न करता इथल्या चार मतदारसंघात उध्दव ठाकरेंच्या पक्षाकडून परस्पर उमेदवार घोषित केल्याचा आरोप पोटे यांनी केला. त्यांच्या उमेदवाराचे काम करायचे की नाही याचा निर्णयही आम्ही लवकरच घेऊ असेही पोटे यांनी स्पष्ट केले. यावेळी पोटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.