कार्यालयात वेळेवर या; वेळकाढुपणा चालणार नाही अन्यथा कारवाई अटळ
By प्रशांत माने | Published: August 29, 2023 05:49 PM2023-08-29T17:49:37+5:302023-08-29T17:51:06+5:30
केडीएमसी मुख्यालयासह सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली आहे.
कल्याण: केडीएमसी मुख्यालयासह सर्वच प्रभाग कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचा-यांच्या दैनंदिन हजेरीसाठी बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली आहे. पण बहुतांश कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. जाणुनबुजुन कार्यालयात उशीरा येवून संध्याकाळी उशीरापर्यंत कार्यालयात उपस्थित असतात हे वर्तन वेळकाढूपणाचे असून असे आढळून आल्यास शिस्तभंगाची कारवाईस पात्र ठराल असा सज्जड इशारा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी दिला आहे.
वर्ग १, २ व ३ मधील अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ अशी असून वर्ग ४ मधील कार्यालयीन कर्मचा-यांची वेळ सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.३० अशी निश्चित केली आहे. कोरोनात बायोमेट्रीक हजेरी बंद करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतरही बराच कालावधीपर्यंत ती सुरू करण्यात आलेली नव्हती. त्या दरम्यान ‘कधीही यावे आणि कधीही जावे’ असे वर्तन अधिकारी, कर्मचा-यांकडून सातत्याने घडत होते. नागरीकांच्या याबाबतच्या वाढत्या तक्रारी पाहता मे महिन्यात मुख्यालयासह प्रभाग कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरी सुरू करण्यात आली आहे. परंतू बायोमेट्रीक हजेरी मशीन बसवून देखील अधिकारी कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे आयुक्त दांगडे यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी परिपत्रक जारी करून हजेरीबाबत सूचना दिल्या आहेत. संबंधित व्यक्ती निश्चित केलेल्या वेळेनंतर हजर झाल्यास जेवढा वेळ उशिर झाला तेवढा वेळ संध्याकाळी कार्यालयीन काम करणे बंधनकारक राहील. अधिकारी, कर्मचा-यांच्या कार्यालयात येण्या-जाण्याच्या वेळेमध्ये सुधारणा होत नसल्यास संंबंधित अधिकारी कर्मचारी निलंबनासह गंभीर शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरतील असेही परिपत्रकात नमूद केले गेले आहे.
हजेरी पडताळणी पथक अचानक देणार धडक
आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त तसेच बायोमेट्रीक हजेरी पडताळणी पथकातील कर्मचारी यांनी आकस्मिक पाहणी केल्यास व कर्मचारी कार्यालयात गैरहजर आढळून आल्यास,संबंधिताची बिनपगारी रजा गृहीत धरून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.