लोकग्रामचा पादचारी पूल पाडण्याच्या कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 12:27 AM2021-03-07T00:27:10+5:302021-03-07T00:27:33+5:30
जूनपर्यंत चालणार काम : बांधकामाची निविदा एप्रिलमध्ये होणार प्रसिद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पूर्व भागातील कल्याण रेल्वे स्थानक ते लोकग्राम संकुलाला जोडणारा व धोकादायक झालेला लोकग्राम पादचारी पूल अखेर पाडण्यास सुरुवात झाली आहे. नवीन पुलाच्या कामाला लवकर सुरुवात केली जाईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. लोकग्राम पादचारी पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ७ मधून रेल्वे यार्डातून पूर्वेतील लोकग्राम संकुलात जातो. मात्र, हा पूल धोकादायक झाल्याने तो रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे काम लवकर मार्गी लावण्यासाठी शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
पुलाच्या बांधणीसाठी ७८ कोटी रुपयांचे प्राकलन आहे. पुलासाठी पुरेसा निधी कल्याण-डोंबिवली मनपाकडे नसल्याने तो स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यासाठी खासदार आग्रही होते. हा निधी स्मार्ट सिटी अंतर्गत उपलब्ध करून देत तो रेल्वेकडे वर्ग करण्यात आला आहे.
पूल पाडण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. तर, शुक्रवारपासून पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. हे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होईल. मात्र, नव्या पुलाचे बांधकाम लवकर सुरू व्हावे, यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पुलाचे पाडकाम व नवे काम हे हैदराबाद येथील कंपनीला मिळाले आहे. नावेद इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला हे काम सबकॉन्ट्रॅक्ट करार तत्वावर दिले आहे.