डोंबिवलीत अस्वच्छतेवरून आयुक्त दांगडे यांचा अधिकार्याना सज्जड दम; आयुक्तांची रात्रीत सरप्राईज व्हिजिट
By अनिकेत घमंडी | Published: October 19, 2022 02:25 PM2022-10-19T14:25:57+5:302022-10-19T14:26:32+5:30
रेल्वे स्टेशनच्या १५० मीटर परिसरात फेरीवाले नकोत
डोंबिवली: दिवाळीच्या अनुषंगाने परिसर स्वच्छ ठेवण्याकरीता २४ तास ऑनफिल्ड काम करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व संबधित अधिकारी वर्गाला दिल्या होत्या, त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री अचानक दांगडे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचा पाहणी दौरा केला, मात्र परिसरातील अस्वच्छता पाहून संबंधित प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना फैलावर घेत सर्वत्र स्वच्छता राखणे, वेळच्या वेळी कचरा उचलून घेण्याबाबत सज्जड ताकीद दिली.
नगरी स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी कचरा वेळेत उचलून घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी, हॉटेलधारकांनी, दुकानदारांनी देखील त्यांचा कचरा रस्त्यावर वा इतरत्र न टाकता महापालिकेच्या घंटागाडीत देऊन शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, असेही आवाहन दांगडे यांनी या पहाणी दौ-या दरम्यान केले.
कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ १५० मी. परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. जर या ठिकाणी फेरीवाले आढळून आल्यास संबंधित प्रभागक्षेत्र अधिकारी/पथक प्रमुख यांच्यावर कारवाई केली जाईल , असा इशारा डॉ.दांगडे यांनी दिला.
झोपडपट्टी परिसरात प्रामुख्याने महापालिकेच्या घंटागाड्या पोहोचत नाहीत, अशा ठिकाणचे लोक बाहेर कचरा टाकत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हा कचरा रात्रीच उचलून घेण्याची व्यवस्था महापालिकेकडून करण्यात आली आहे, तो कचरा सकाळी पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जाईल अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. त्यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे, महापालिका सचिव संजय जाधव, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे, कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, सहा.आयुक्त दिनेश वाघचौरे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या आधी देखील तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनीही अशीच रात्रीची भेट देत स्कायवॉकवरील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती, तेव्हापासून साधारण वर्षभर फेरीवाले बसले नव्हते, पण आता पुन्हा रात्रीच्या वेळेत फेरीवाले बसायला लागले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"