आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल: आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 03:42 PM2021-10-02T15:42:57+5:302021-10-02T15:43:42+5:30
महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: महापालिकेच्या ताब्यात आलेल्या आरक्षित भूखंडांवर नागरिकांच्या वापराच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या अ प्रभागातील आंबिवली येथील नेपच्यून स्वराज येथील आरक्षित भूखंडावर वृक्षारोपण करतेवळी त्यांनी हे उद्गार काढले. या परिसरात कबड्डी खेळणारे खूप तरुण आहेत, त्यामुळे या परिसरामध्ये आपण जास्तीत जास्त कबड्डीचे मैदाने तयार करण्याचा प्रयत्न करु, असेही ते पुढे म्हणाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे औचित्य साधून आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील स्वच्छता दूत, एनजीओ, इमारतीच्या आवारात खत प्रकल्प राबविणाऱ्या गृहनिर्माण संस्था, स्वच्छता कामगार यांचा प्रशस्तीपत्रक देऊन आयुक्त सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन आपला परिसर व आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे राहील याची काळजी घ्यावी.
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही स्वतःची जबाबदारी ओळखून त्यामध्ये कुचराई होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी व नागरिकांच्या सहकार्याने आपल्या शहराच्या किमान स्वच्छतेच्या बाबतीत तरी कायापालट करावा, असे आवाहन सूर्यवंशी यांनी करुन उपस्थितां समवेत स्वच्छतेची शपथ घेतली .राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या प्रभागांत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.