रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी रात्री आयुक्तांची सरप्राईज व्हीजीट
By मुरलीधर भवार | Published: September 12, 2023 04:38 PM2023-09-12T16:38:27+5:302023-09-12T16:39:22+5:30
गणपतीच्या आगमनापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ब प्रभाग कार्यालयासमोरील खड्डे बुजवितानाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी अचानक भेट दिली. कामाची पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत आयुक्तांनी विविध ठिकाणच्या पाहणी केली. त्यामुळे आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून केलेली नाइट ड्युटी चर्चेचा विषय ठरली आहे.
पावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला रविवारी रात्रीपासून सुरुवात केली आहे. येत्या तीन दिवसांत रस्त्यावरील बहुतांश खड्डे भरण्यात येणार आहेत. गणपतीच्या आगमनापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम चांगल्याप्रकारे केले जात आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी आयुक्तांनी काल रात्री केली. यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे हेदेखील उपस्थित होते.
कोणत्या ठिकाणी प्राधान्याने काम केले जात आहे, याची माहिती अहिरे यांनी आयुक्तांना दिली. संदीप हाॅटेल, ब प्रभागातील कामाची पाहणी आयुक्तांनी केली. ज्याठिकाणी खड्डे भरले जात आहे. ते काम चांगल्या दर्जाचे असावे, अशा सूचनाही अभियंते आणि कंत्राटदाराला दिल्या आहेत. त्याचबरोबर आयुक्तांनी कल्याण खाडीकिनारी असलेल्या गणेशघाटाची पाहणी केली. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने काय उपाययोजना केली आहे. याचादेखील आढावा घेतला.