राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना

By मुरलीधर भवार | Published: November 26, 2022 04:40 PM2022-11-26T16:40:16+5:302022-11-26T16:41:03+5:30

या निर्णयामुळे राज्यभरातील मतदारांना दिलासा मिळाला आहे.

Commission's suggestion for ward wise voter list in the state | राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना

राज्यात प्रभागनिहाय मतदार यादी करण्याची आयोगाची सूचना

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्राबरोबरच राज्यभरातील महापालिका क्षेत्रातील मतदारयादीतील दोष व त्रूटींबाबत पडताळणी करून मतदारांचे विभाग व पत्त्याबरोबरच प्रभागानुसार मतदार यादी तयार करावी, अशी सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्या पत्रानंतर निवडणूक विभागाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

या निर्णयामुळे राज्यभरातील मतदारांना दिलासा मिळाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये काही प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात आणि दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावे तिसऱ्या प्रभागात गेली होती. त्यामुळे मतदारयादीत नाव असूनही शेकडो मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची भीती होती. या संदर्भात मोठ्या प्रमाणावर राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिकांनी आक्षेप घेतले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत ७ नोव्हेंबर रोजी विशेष बैठक घेतली होती. 

या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी निवडणूक विभागाचे मतदार यादीतील गोंधळाकडे लक्ष वेधले.  तसेच केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची ११ नोव्हेंबर रोजी भेट घेतली होती. तसेच त्यांचे महाराष्ट्रातील महापालिकांच्या मतदारयाद्यातील दुरुस्तीकडे लक्ष वेधले होते. त्याला आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर त्याबाबत राज्यातील निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले होते.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी काल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मतदारनोंदणी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची ऑनलाईन विशेष बैठक घेतली. त्यावेळी निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतील दोष व त्रूटींबाबत पडताळणी करून मतदारांचा सेक्शन, पत्ता यामध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रभागनिहाय मतदार यादी करण्याच्या सूचना दिली आहे.

Web Title: Commission's suggestion for ward wise voter list in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण