कंपन्या 2700, मात्र अधिकारी केवळ तीनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 12:47 AM2021-01-12T00:47:51+5:302021-01-12T00:48:12+5:30
तीन पदे मंजुरीच्या प्रतीक्षेत : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयावर वाढला ताण
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयांतर्गत दोन हजार ७०० कंपन्या येत असून, त्यांच्या पाहणीसाठी केवळ तीन अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. सरकारकडे आणखी तीन उपसंचालक वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप ती मंजूर झालेली नाहीत.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याणच्या कार्यालयांतर्गत कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी हे सहा तालुके येतात. तेथे दोन हजार ७०० कंपन्या आहेत. त्या तुलनेत या कार्यालयात एक सहसंचालक व तीन उपसंचालक आहेत. उपसंचालकांना प्रत्यक्ष घटनास्थळी वा कंपनीत जाऊन पाहणी करावी लागते. मात्र, हा परिसर मोठा असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे.
कल्याण, भिवंडी व अंबरनाथ तालुक्यांतील कंपन्यांमध्ये नेहमी दुर्घटना घडतात. डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक कंपन्या व कापडावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मागील काही वर्षांत या कंपन्यांमध्ये आग, स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांच्या तपासणीसाठी तीन उपसंचालकांची गरज आहे. मात्र, ते उपलब्ध करून दिले जात नाहीत. प्रोबेस कंपनीच्या स्फोटानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात अधिकारी कमी असल्याची बाब उघड झाली होती.
तपासणी करण्यावर मर्यादा
२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्पेक्टर राज संपविण्यासाठी सुलभ व्यावसायिकीकरणाचे धोरण जाहीर केले. त्याची अंमलबजावणी २०१७ मध्ये सुरू झाली. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यास सरकारच्या मुख्यालयातून कोणत्या कंपन्यांची तपासणी करायची आहे, याची यादी पुरविली जाते. त्यानंतरच अधिकारी कंपनीची पाहणी करू शकतो. एखाद्या कंपनीत गैर प्रकार सुरू असला तरी यादीत त्या कंपनीचे नाव नसेल तर तेथे तपासणी करण्यावर मर्यादा येतात, असे सूत्रांनी सांगितले.