कंपनीत झाला स्फोट, घरात झोपलेल्या व्यक्तीने गमावले पाय; १०० किलोचा लोखंडी भाग पडला घरावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:03 AM2024-08-06T10:03:16+5:302024-08-06T10:03:29+5:30

बदलापूर एमआयडीसीतील घटना

Company explodes, sleeper loses legs; A 100 kg iron part fell on the house | कंपनीत झाला स्फोट, घरात झोपलेल्या व्यक्तीने गमावले पाय; १०० किलोचा लोखंडी भाग पडला घरावर

कंपनीत झाला स्फोट, घरात झोपलेल्या व्यक्तीने गमावले पाय; १०० किलोचा लोखंडी भाग पडला घरावर

बदलापूर :बदलापूर एमआयडीसीतील एका औषध कंपनीत झालेल्या स्फोटामुळे रिॲक्टरचा लोखंडी १०० किलो वजनाचा एक भाग सुमारे ४०० मीटर लांब असलेल्या एका घरावर पडला. तो लोखंडी भाग घरात झोपलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या पायावर पडला. यामध्ये त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.

    सोमवारी पहाटे ४:३० च्या सुमारास बदलापूरच्या मानकिवली एमआयडीसीतील रारे फार्मा प्रा. लि. कंपनीत ही दुर्घटना घडली. कंपनीतील रिॲक्टरजवळील रिसिव्हर टँकमध्ये स्फोट होऊन आग लागली. या वेळी त्याचा सुमारे १०० किलो वजनाचा एक लोखंडी भाग उडून ४०० मीटर अंतरावर असलेल्या खरवई गावातील एका चाळीतील घरावर पडला. तो लोखंडी भाग घराच्या छताचा पत्रा फोडून झोपेत असलेल्या घनश्याम मिस्त्री यांच्या पायावर पडला. त्यामुळे त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. शेजारी झोपलेली त्यांची पत्नी धनश्री व मुलगी सिया जखमी झाल्या. त्यांना केईम रुग्णालयात दाखल केले.

रारे फार्मा प्रा. लि. या कंपनीत औषधांच्या गोळ्या तयार करण्यासाठी लागणारा विव्हो बेंझोल हा पदार्थ तयार केला जातो. त्यामध्ये मिथेनॉल हे पेट्रोलपेक्षा अधिक ज्वालाग्राही रसायन वापरले जाते. कंपनीत याचा मोठ्या प्रमाणात साठा होता. तसेच स्फोटानंतर या रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत आग लागल्याचे सोनोने यांनी सांगितले. 

तांत्रिक बिघाडाचे कारण...

 स्फोटाच्या हादऱ्यांनी कंपनीची शेड व इतर साहित्य पूर्णतः उद्ध्वस्त झाले. त्याशिवाय कंपनीत असलेल्या अतिज्वालाग्राही रसायनाने पेट घेतल्याने कंपनीत आग लागून इतर साहित्य जळून खाक झाले.

 आगीचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कंपनीतील प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे फायर ऑफिसर भागवत सोनोने यांनी व्यक्त केला.

Web Title: Company explodes, sleeper loses legs; A 100 kg iron part fell on the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.