बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदाराच्या जीवितास धोका, न्यायालयात नोंदविला जबाब
By मुरलीधर भवार | Published: November 21, 2022 02:51 PM2022-11-21T14:51:01+5:302022-11-21T14:51:40+5:30
KDMC : बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी या प्रकरणात कल्याण न्यायालयात जबाब नोंदविला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - बिल्डर फसवणूक प्रकरणातील तक्रारदार संदीप पाटील यांच्या जिविताला धोका असल्याने त्यांनी या प्रकरणात कल्याणन्यायालयात जबाब नोंदविला आहे. मात्र पाटील यांना अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खोटय़ा सही शिक्क्याचा वापर करुन काही बिल्डरांनी महापालिकेची बांधकाम परवानगी मिळविल्याची कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रंच्या आधारे बिल्डरांनी रेरा प्राधिकरणास परवानगी मिळविल्याचे भासवून रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. माहिती अधिकारात ही बाब तक्रारदार पाटील यांनी उघड केली. या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच महापालिकेसह रेरा प्राधिकरणाकडे तक्रार केली.
महापालिकेने या प्रकरणात डोंबिवलीतील मानपाडा आणि रामनगर पोलिस ठाण्यात 65 बिल्डरांच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर ईडीकडूनही चौकशी सुरु आहे. एसआयटीने आत्तार्पयत पाच जणांना अटक केली आहे. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच जण आणि बिल्डारांची मिळून 56 बँक खाती गोठविण्यात आली. दरम्यान तक्रारदार पाटील यांच्या जिवितास धोका असल्याने पाटील यांनी त्यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती. त्यांना अद्याप पोलिस संरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचा फायनल जबाब नोंदविला जाईल नाही याविषयी त्यांना साशंकता असल्याने त्यांनी कल्याण न्यायालयात त्यांचा जबाब नोंदविला आहे.