इलेक्ट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी; KDMCचा महत्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 07:53 PM2021-05-21T19:53:06+5:302021-05-21T19:53:24+5:30
दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा कल्याण डोंबिवली शहराला देखील तडाखा बसला आहे. यामध्ये अनेक घरांची पडझड होऊन मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.पार्श्वभूमीवर त्यांच्या दुरुस्तीच्या दृष्टीने केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित साहित्याची दुकाने सुरू ठेवण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
एकीकडे घरांचे नुकसान झाले असून दुसरीकडे पावसाळा देखील तोंडावर आला आहे. त्यामुळे घरांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेता आयुक्तांनी 22 मे ते 31 मे या कालावधीत सोमवार ते शुक्रवारपर्यंत संबंधित दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल , हार्डवेअरसह ताडपत्री साहित्याच्या दुकानांचा समावेश असून दिलेल्या कालावधीत ती सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी पालिकेने आदेशीत केलेल्या निर्बंधांचे दुकानदार आणि ग्राहकांनी पालन करणे आवश्यक असल्याचे नमूद करत उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
* काय आहेत नविन आदेश..
- दुकानदार आणि ग्राहक यांना डबल मास्क घालणे बंधनकारक...
- एकाचवेळी जास्तीत जास्त 5 ग्राहकांना प्रवेश...
- दुकानात पुरेशा प्रमाणात सॅनिटायजर आवश्यक
- इलेक्ट्रिकल, हार्डवेअरसह ताडपत्री साहित्य दुकानांना सशर्त परवानगी...
- 22 मे ते 31 मे पर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा...
- सकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील दुकाने...
- शनिवार आणि रविवार दुकाने पूर्णपणे बंद ठेवावी लागणार...