केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:14 AM2021-05-02T00:14:16+5:302021-05-02T00:14:39+5:30

पहाटे ४ वाजल्यापासून लावली रांग : रजिस्ट्रेशन न करणारे पोहाेचले लस घेण्यासाठी

Confusion at KDMC's vaccination center | केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क 
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने शनिवारी पश्चिमेतील आर्ट गॅलरी येथे लसीकरण केंद्र सुरू ठेवले होते. तेथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना  लस दिली जाईल. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना लस दिली जाईल, असे आवाहन मनपाने केले होते, तरीही या केंद्रावर गोंधळ उडाला.
लस घेण्यासाठी २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी आठ जण केंद्रावर पोहाेचले होते. ज्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते तेही लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहाेचले. त्यांनी पहाटे ४ पासून लसीकरण केंद्राबाहेर रांग लावली होती. सकाळी ८ वाजता भलीमोठी रांग पाहून व्यवस्थापनाने त्यांना टोकन दिले होते. त्यांनी टोकन घेऊन रांगेत उभे राहणे पसंत केले. मात्र, दुपारी १ च्या सुमारास प्रशासनाने सांगितले की, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस दिली जाईल. तेव्हा टोकन घेऊन रांगेत उभ्या असलेल्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लस द्यायचीच नव्हती, तर टोकन देऊन रांगेत कशाला उभे केले, असा संतप्त सवाल मयूर महाजन याने केला. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणारे रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी येणार नसतील, तर ज्यांना टोकन देऊन रांगेत उभे केले आहे, त्यांना लस द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

एजन्सीची चूक : उपायुक्त
महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी सांगितले की, २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. २०० डोस केंद्रासाठी उपलब्ध झाले होते. गर्दी झाल्याने रांगेत उभे असलेल्यांना टोकन दिले गेले, तर उपायुक्त भागवत यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीची चूक असल्याचे नमूद केले.


 

 

Web Title: Confusion at KDMC's vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.