देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला काँग्रेसचे बॅनर, पण निशाण्यावर पालकमंत्री
By मुरलीधर भवार | Published: June 17, 2023 06:46 PM2023-06-17T18:46:44+5:302023-06-17T18:48:30+5:30
जेणेकरुन भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री पाहावयास मिळतील.
कल्याण - येत्या १९ जून रोजी कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शहरात बॅनर लावला आहे. साहेब आपले कल्याणमध्ये स्वागत आहे. मात्र, येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन या. जेणेकरुन भाजप पदाधिकाऱ्यांसोबत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना देखील पालकमंत्री पाहावयास मिळतील.
सध्या राज्यात बॅनरबाजीच्या माध्यमातून जोरदार राजकारण सुरू आहे. कधी भावी मुख्यमंत्र्यांचा बॅनर, कधी भाजपचा कधी शिवसेनेकडून एकमेकांना डिवचण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर, यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे. १९ जून रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस हे कल्याणात येणार आहेत.. भाजपच्या मोदी @9 महा जनसंपर्क अभियान अंतर्गत फडके मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्ह्या काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपहासात्मक बॅनर लावला आहे. हा बॅनर चर्चेचा विषय ठरला. काही दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालकमंत्री हरविले असल्याचा बॅनर लावला होता. तो बॅनर लावता क्षणीच पोलिसांनी बॅनर जप्त करण्याची कारवाई केली होती. त्यानंतर पालकमंत्री ठाणे नियोजन समितीच्या बैठकीस हजर होते. मात्र, त्यांचा ठाणे जिल्ह्यात दौरा झालेला नाही.
मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, पण पालकमंत्र्यांना ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी वेळ नाही ही संधी साधत काँग्रेसने पालकमंत्र्यांना टिकेचे लक्ष्य केले आहे.