पोलिस शासनाच्या दबावाखाली पण काँग्रेस मिळवून देईल न्याय; पटोलेंनी घेतली पिडीतेची भेट
By प्रशांत माने | Published: June 21, 2023 08:11 PM2023-06-21T20:11:50+5:302023-06-21T20:12:06+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर होते.
डोंबिवली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्याला भेट देऊन नंदू जोशी विनयभंग प्रकरणातील पिडीतेची भेट घेऊन तिच्याशी चर्चा केली. पोलिसांवर शासनाचा दबाव आहे. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नाही पण काँग्रेस पिडीत महिलेला न्याय मिळवून देईल असे प्रतिपादन पटोले यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.
भाजपचे पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या दाखल गुन्हयाचे तीव्र पडसाद भाजपसह शिवसेनेच्या राजकारणात उमटले आहेत. भाजपने जोशी यांच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्हयाच्या विरोधात पोलिस ठाण्यावर मोर्चा देखील काढला होता. दरम्यान काँग्रेसने आरोपीला तत्काळ अटक करा अशी मागणी लावून धरली असून बुधवारी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी पिडीतेची भेट घेतली. शासनाचा पोलिस विभागावर असलेला दबाव आम्ही बघतोय, ठाणे जिल्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आहे. भाजप विरूध्द शिंदे गट या लढाईत पोलिसांवर जो दबाव आहे तो ख-या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला न भूषविणारा आहे. एक अबला महिला न्यायासाठी पोलिस ठाण्याच्या बाहेर उपोषणाला बसली आहे. गुन्हा दाखल होऊनही आरोपीला पकडले जात नाही, चौकशी केली जात नाही. त्यामुळे पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे हा प्रश्न याठिकाणी निर्माण झाला आहे असे पटोले म्हणाले.
पक्षाचा विधी व न्याय सेल घेणार दखल
काँग्रेस पक्षाचा विधी व न्याय सेल आहे. त्याचे वकील गुरूवारी पिडीत महिलेची भेट घेतील आणि तिने केलेल्या तक्रारीचा एफआयआर घेतील. न्यायालयातून पीडितेला न्याय मिळवून देण्याची भुमिका आम्ही घेतली असल्याकडे पटोले यांनी लक्ष वेधले.