कल्याण माळशेज घाट रस्त्याचे चौपदरीकरण अन् बोगदा मार्ग तयार करा; भाजपाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 03:12 PM2021-08-02T15:12:35+5:302021-08-02T15:12:52+5:30
भाजपा आमदार किसन कथोरे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट
कल्याण- कल्याण माळशेज घाटाच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे. त्याचबरोबर मालशेज घाटयाच्या पायद्यापासून मढ र्पयत टनेल खोदून मार्ग तयार केला जावा अशी मागणी मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात भाजप आमदार कथोरे यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. यावेळी पंचायत राज केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील हे देखील उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आहे. कल्याण माळशेज घाट रस्ता हा चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आमदार कथोरे यांनी यापूर्वी मांडला होता. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव हा जवळपास 1200 कोटी रुपये खर्चाचा आहे. दरम्यान दोन वर्षापूर्वी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे सव्रेक्षण करण्यासाठी कल्याण नगर मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय तत्कालीन प्रांत अधिका:यांनी घेतला होता. मात्र काही कारणास्तव त्याचे सव्रेक्षण रखडले आहे. या चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी आमदार कथोरे यांच्यासह राज्यमंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. याच संदर्भात कथोरे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्लीत भेट घेतली.
कल्याण माळशेज घाटाच्या चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरु करण्यात यावे या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. कल्याण नगरला जोडणारा रेल्वे मार्ग नाही. कल्याण मुरबाडर्पयत रेल्वेचे काम करण्यात येणार आहे. मात्र कल्याण नगर रस्त्यावर वाहतूकीचा ताण आहे. रस्ता अरुंद आहे. कल्याण माळशेज मार्गातून वाहतूक करताना विशेषत: पावसाळ्यात घाट मार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे माळशेज घाटाच्या पायथ्यापासून एक बोगदा खोदून रस्त्या तयार केला जावा. हा रस्ता पार मढ येथे निघणार आहे. या रस्त्याचा डीपीआर तयार आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी येत्या 4 ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक घेतली जाईल असे आश्वासीत केले आहे.
दरम्यान नवी मुंबई मार्गे शीळफाटा ते एरंजड, म्हसा धसई मार्गे माळशेज घाट रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची मागणी कथोरे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे केली आहे. मुरबाड विधानसभा मतदार संघ हा भविष्यात राज्यातील सर्वच राष्ट्रीय महामार्गाना जोडणारा मतदार संघ असणार असल्याचे कथोरे यांनी सांगितले.