एमआयडीसीत चांगले रस्ते उखडण्याचे काम जोरात; जल, वीज वाहिन्याना धोका
By अनिकेत घमंडी | Published: October 6, 2023 04:20 PM2023-10-06T16:20:13+5:302023-10-06T16:20:25+5:30
जनतेचाच पैशाची नासाडी होत असल्याने या गंभीर परिस्थितीला संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे.
डोंबिवली: एमआयडीसी निवासी भागातील काँक्रीटीकरण रस्ते हे एमएमआरडीएतर्फे बांधण्यात येत आहेत. कुठलेही पूर्व नियोजन न केल्याने आता नवीन केलेले काँक्रीटीकरण रस्ते वीज, जलवाहिन्यांना नुकसान पोहचल्याने ते चांगले रस्ते आता तोडावे/फोडावे लागत असल्याने येथील नागरिक वैतागले असून जनतेचाच पैशाची नासाडी होत असल्याने या गंभीर परिस्थितीला संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे.
आजतागायत एकूण १२ नवीन काँक्रीटीकरण रस्ते फोडण्यात आले आहेत. सद्या निवासी विभागात पाच ठिकाणी काँक्रिट रस्ते फोडण्यात आल्याचे दिसून येत असून बहुतेक या ठिकाणी वीज वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने हे रस्ते फोडण्यात आले आहेत. तेथील प्रत्यक्षदर्शी जुने रहिवासी, दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले की, सुदर्शननगर मधील श्री मंजुनाथ सोसायटी आरएच ५५ समोर, गावदेवी मंदिर/संधिनी सोसायटी आरएच- ११७ जवळ, मिलापनगर तलाव रोडवरील आरएल - ४१ बंगल्या समोर, मॉडेल कॉलेज बस स्टॉप/सुगंध सोसायटी आरएच- १२ जवळ असे काँक्रिट रस्ते वीज वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने तोडण्यात/फोडण्यात आले असून काम पूर्ण झाल्यावर थूकपट्टी करून साधारण लेव्हलिंग करून ते रस्ते पुन्हा बनविले जातात.
यापूर्वी वीज वाहिन्या बरोबर पाण्याच्या पाइपलाइन, रासायनिक/घरगुती सांडपाणी वाहिन्यांना नुकसान पोहचल्याने हे काँक्रिट रस्ते फोडण्यात आले होते. डिसेंबर २०२२ मध्ये निवासी भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात सुरवात झाली होती तेव्हा अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी सदर रस्त्यांचे काम चालू करण्यापूर्वी रस्त्यांत मध्ये येणाऱ्या वीज, पाणी, सांडपाणी इत्यादींचा वाहिन्या, महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, डीपी बॉक्स हे योग्य ठिकाणी बाजूला घेऊन तसेच रस्त्यांसाठी अडथळा ठरणारे वृक्ष यांची पाहणी करून त्यानंतर रस्त्यांचे काम चालू करावे अशी विनंती एमएमआरडीए, एमआयडीसी, महावितरण, लोकप्रतिनिधी यांना केली होती.
परंतु ही बाब कोणीच गांभीर्याने घेतली नसल्याने आता नवीन काँक्रीटीकरण केलेले रस्ते खोदावे/फोडावे लागत आहेत. यापुढेही वाहिन्यांना नुकसान पोहचल्यास हे रस्ते फोडण्याचे, तोडण्याचे काम असेच कायमस्वरूपी चालू राहणार असे दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी एमआयडीसी निवासीकराना चांगले काँक्रीटीकरण रस्ते मिळाले होते पण ते येणाऱ्या काही वर्षातच खराब, खड्डेमय होणार आहेत. अजूनही काही रस्ते होण्याचे बाकी आहेत त्यात तरी वाहिन्या/विजेचे डीपी बॉक्स बाजूला घेऊन रस्त्यांचे कामे करावीत अशी मागणी नागरिकांनी केली.