गटार सफाई दरम्यान कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By मुरलीधर भवार | Published: June 22, 2023 08:18 PM2023-06-22T20:18:13+5:302023-06-22T20:18:23+5:30
मृत्यूस जबाबदार असलेल्यांच्या विरोधात कारवाई होणार का ?
कल्याण- शहराच्या पूर्व भागातील तिसगाव गावठाण परिसरातील सिंकदर का’लनीनजीक असलेल्या गटारीची सफाई करीत असतान कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव ऋतिक कुरकुटे (२२) असे आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ऋतिक हा कसारा नजीकच्या कारेगावचा राहणारा होता.
महापालिकेने लहान गटारी स्वच्छ करण्याची कामे कंत्राटी पद्धतीने दिलेली आहेत. सकाळी सात ते दुपारी २ या वेळेत कंत्राटी कामगारांकडून गटारींची सफाई करुन घेतली जाते. ऋतिक आज कामावर आला होता. दुपारी तो गटार साफ करीत असताना त्यांच्या जोडीला अन्य एक सहकारी कामगार होता. त्याठिकाणी एका नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीचे काम सुरु आहे. तसेच नजीकच चाळी आहे. त्याठिकाणी गटारीत सफाई करीत असलेल्या ऋतिकला विजेचा तारेचा धक्का लागला. त्यावेळी ऋतिकने आवाज केला.
त्याला वाचविण्यासाठी त्याचा सहकारी कामगार पुढे सरसावला. मात्र त्याला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. ऋतिक जागीच मरण पावला होता. ऋतिकचा ज्या वीजेच्या तारेमुळे मृत्यू झाला. ती वीजेची तार बिल्डरची होती की नजीकच्या चाळ धारकांची होती. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करुन कंत्राटी कामगारांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या विरोधात ठाेस कारवाई केली जावी अशी मागणी केली जात आहे.