"पहिल्या आरमाराच्या स्थापनेत आगरी-कोळी बांधवांचे योगदान"
By मुरलीधर भवार | Published: December 16, 2023 03:55 PM2023-12-16T15:55:44+5:302023-12-16T15:56:11+5:30
इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदर पाडेकर यांचे प्रतिपादन
डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराजांनी आगरी-कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या व भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच पेशव्यांनीही आगरी-कोळी बांधवांमधील धैर्य, काटकपणा आणि प्राण पणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमांमध्ये सहभागी करून घेतले होते, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक निनाद पाटील-बंदरपाडेकर यांनी शुक्रवारी येथे केले.
आगरी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी स्वराज्य उभारणीत `आगरी समाजाचा सहभाग' या विषयावर निनाद पाटील-बंदरपाडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. संयोजन समितीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी त्यांचे स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव केल्यानंतर कल्याण-भिवंडी पादाक्रांत केली. त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी-कोळी बांधवांना देत जहाजबांधणी सुरू केली होती. मुरुड-जंजिरा मोहिमेत १६७५ मध्ये कुलाब्याचे लाय पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्यप्राय कामगिरी केली. मात्र, वेळेवर सैन्य न आल्यामुळे विजय हुकला होता. लाय पाटील यांच्या पराक्रमाची दखल छत्रपती शिवाजी महाराजांनी घेऊन त्यांना रायगडावर सन्मान करून `पालखी' नावाचे गलबत भेट दिले होते. १७३९ मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी आगरी-कोळी भूमिपूत्रांची मोट बांधली होती. त्यातील ८०० सैनिकांची कुमक उरण-करंजा बेटावर तैनात केली. त्या ठिकाणी हल्ला करण्याचा इंग्रजांचा विचार होता. पण आगरी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यावर इंग्रजांनी हल्ल्याचा विचार सोडून दिला होता, असे प्रतिपादन श्री. पाटील यांनी केले.
पेशव्यांच्या काळात वसईच्या मोहिमेत चिमाजीआप्पांना आन ठाकूर व मान ठाकूर यांनी मदत केली होती. त्यांनी वसई किल्ल्याच्या बुरुजाला चिरे पाडून सुरूंग भरला होता. या सुरुंगांच्या स्फोटाने बुरुज उद्धवस्त होऊन मराठ्यांचे सैन्य किल्ल्यात घुसले. परंतु, आन व मान ठाकूर यांनी स्फोटात बलिदान दिले. बोळींजच्या दौराजी पाटील यांनीही वसईच्या मोहीमेत सहभाग घेतला होता. तर अंजुरच्या गंगाजी नाईक-अंजुरकर यांनीही पेशव्यांच्या सैन्याला मदत केली होती. पेशवा रघुनाथराव पेशवा यांनी अटकेपार झेंडा फडकविला होता. या मोहिमेतही ५० आगरी-कोळी योद्धे सहभागी होते. परंतु, दुर्देवाने त्यांची सध्या कोठेही नोंद नाही, अशी माहिती निनाद पाटील यांनी दिली.