आग्रा-मुंबई लष्कर एक्सप्रेसमध्ये थुंकण्यावरून वाद; विरोध करणाऱ्या दोघांना तरुणांनी केली मारहाण
By मुरलीधर भवार | Published: April 8, 2024 07:25 PM2024-04-08T19:25:03+5:302024-04-08T19:25:21+5:30
कल्याण रेल्वे पोलिसांनी चार तरुणांना केली अटक, मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग
कल्याण-आग्रा मुंबई लष्कर एक्सप्रेस मध्ये प्रवासादरम्यान थुंकण्यास विरोध केल्याने दोन प्रवाशांना तरुणांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याची घटना काल घडली. मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडली . मारहाण करणाऱ्या तरुणांना कल्याण रेल्वे स्थानकात कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
या मारहाण करणाऱ्या सहा तरुणांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रमोद माळी, अजय पवार, गणेश कापसे, अजय कापसे अशी आहेत. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूढील तपासाकरीता हा गुन्हा मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. अटक आरोपीना मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
आग्रा मुंबई लष्कर एक्सप्रेस मधून मुंबईच्या दिशेने प्रशांत सिंग आणि जगविर उर्फ गणेश सिंग हे दोघे काल प्रवास करत होते .मनमाड आणि नाशिक रोड रेल्वे स्थानका दरम्यान काही तरुण एक्स्प्रेसमध्ये थुंकत होते. .प्रशांत आणि गणेशने या तरुणांना येथे थंकू नका असे सांगत थुंकण्यास विरोध केला . त्यामुळे संतापलेल्या या तरुणांनी प्रशांत आणि जगवीर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणात या सहा तरुणांनी प्रशांत आणि जगवीर यांना बेदम मारहाण केली . याच डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिसांनी लष्कर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात येताच मारहाण करणाऱ्या चार तरुणांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.