कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 11:06 PM2021-08-30T23:06:56+5:302021-08-30T23:14:01+5:30

लसीकरण केंद्रावर नागरिकांचे होणारे वाद आणि मारामाऱ्या कर्मचा-यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.  

Controversy at vaccination center In Kalyan; Police mediated the dispute | कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला

कल्याण येथे लसीकरण केंद्रावर गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवला

Next

मयुरी चव्हाण 

कल्याण - दोन डोस घेतलेल्या नागरिकांना राज्य सरकारने लोकल प्रवासाची मुभा देण्याचे जाहीर झाल्यावर  लसीकरणासाठी लसीकरण केंद्राबाहेर लांबलचक रांगा लागत आहे. मात्र, आता लस घेण्यावरून नागरिकांमध्ये  शाब्दिक चकमकी उडत  असल्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. कल्याण पश्चिम परिसरात लसीकरण केंद्रावर दोन तरुणींची नंबरवरून मारहाण झाल्याची  घटना ताजी असतानाच  सोमवारी पुन्हा बारावे  येथील केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर देखील वाद झाल्याचे समजते.  मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर गोंधळ मिटला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

लसीकरण केंद्रावर नागरिकांचे होणारे वाद आणि मारामाऱ्या कर्मचा-यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.  लसीकरण केंद्रांवर सध्या अनेक ठिकाणी भांडणाचे आवाज कानी पडत आहे. बारावे येथील लसीकरण केंद्रावर  सोमवारी मारामारी झाल्याची कुजबुज सुरू होती.  याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी रजनी मिरकुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचे पती  भारत मिरकुटे यांनी कोणत्याही प्रकारची  मारामारी झाली नसल्याचा दावा केला. मात्र लसीकरण केंद्रावर वाद झाल्याचे त्यांनी मान्य केले.  ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या  आणि रांगेत ऑफलाईन पद्धतीने उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये वाद झाला. काही लोक रांगेत उभं न राहता थेट लसीकरण केंद्रामध्ये जात असल्याच्या भावनेतून  हा वाद झाल्याचेही ते म्हणाले.  पोलीस आल्यावर  या वादावर पडदा पडल्याचेही मिरकूटे यांनी स्पष्ट केले. 

 नागरिकांमध्ये नंबरवरून वाद झाल्यावर  रांगेत न थांबता सर्व नागरिकांनी  थेट गेटवर गर्दी करत गोंधळ घातला होता.यावेळी काही नागरिकांनी मास्क परिधान  केला नव्हता  तर सोशल डिस्टंसिंगचाही यावेळी फज्जा उडाल्याचे चित्र होते. या गोंधळाचा व्हीडिओ  लोकमतच्या हाती लागला आहे.  लसीकरणासाठी होत असलेली गर्दी आणि गोंधळाचे चित्र पाहता कोरोना लसीकरण मोहीम की कोरोना संक्रमण मोहीम? असा प्रश्न  निर्माण झाला आहे

Web Title: Controversy at vaccination center In Kalyan; Police mediated the dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.