...तरी ‘फिनशार्प’चे कार्यालय उघडले कसे?; डोंबिवलीतील बँकेवर सहकार विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:39 IST2025-02-13T06:38:37+5:302025-02-13T06:39:27+5:30

डोंबिवलीतील बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची सहकार खात्याची सूचना 

Cooperative Department takes action against Finsharp bank in Dombivli | ...तरी ‘फिनशार्प’चे कार्यालय उघडले कसे?; डोंबिवलीतील बँकेवर सहकार विभागाची कारवाई

...तरी ‘फिनशार्प’चे कार्यालय उघडले कसे?; डोंबिवलीतील बँकेवर सहकार विभागाची कारवाई

डोंबिवली - केंद्र, राज्य सरकारकडे नोंदणी नाही, संचालक मंडळही नाही. मात्र, मोठ्या जाहिराती प्रसिद्ध करून डोंबिवलीत एक बँक चर्चेत आली आहे. फिनशार्प सहकारी बँक असे या बँकेचे नाव आहे. बँकेत कुठलीही खाती उघडलेली नाहीत तरी बँकेचे कार्यालय का सुरू झाले, अशी एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर सहकार विभागाने बँक चालविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिसांना दिली. 

याप्रकरणी कारवाई झाली नसल्याने यंत्रणा सामान्यांची फसवणूक होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत. आगरकर रोड परिसरात फिनशार्प सहकारी बँक उघडण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. या संदर्भात  १४ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीनंतर पोलीस कारवाई करतील असे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, बँकेचा एक फलक मानपाडा रोडवर आढळून आला आहे. 

१४ फेब्रुवारीला सुनावणी
फिनशार्प बँकेने कमी कागदपत्रे, किमान व्याज दरावर कर्ज, पारदर्शक व्यवहार, ठेवींवर साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखविले आहे. याची तक्रार राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सहकार आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली. याची चौकशी सुरू असून, १४ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. फिनशार्प सहकारी बँकेच्या चार संचालकांपैकी एक सतीश पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. बँकेत एक कर्मचारी होता त्याला बँकेबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

याप्रकरणी सरकारने कारवाई केली पाहिजे. बेकायदा बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले पाहिजे. फसवणूक होण्यापूर्वी कारवाई करायला हवी; पण तसे होताना दिसत नाही. - लक्ष्मण शिंदे, ज्येष्ठ नागरिक

अशा प्रकारच्या बँकांमध्ये कष्टाचे पैसे गुंतवू नयेत. त्यामुळे भविष्यात पश्चात्तापाला सामोरे जावे लागेल. संचयनी, टोरेस आदी विविध कंपन्यांनी  नागरिकांची फसवणूक केली. - शशिकांत कोकाटे, नागरिक

या बँकेत कोणतेही खाते नाही; परंतु कार्यालय उघडले आहे. यासंदर्भात आम्ही डोंबिवलीतील पोलिसांना माहिती दिली आहे. फसवणूक झालेली नाही; परंतु फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का, याची खातरजमा पोलिसांनी करावी. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. - आनंद कटके, उपनिबंधक, सहकार खाते

Web Title: Cooperative Department takes action against Finsharp bank in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.