कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 11:47 PM2020-12-04T23:47:23+5:302020-12-04T23:47:41+5:30

केडीएमसी परिसर : इमारतींच्या नव्या बांधकामांच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात.

Coping with other epidemics during the Corona period; Claims that the number of patients has decreased due to taking precautions | कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

कोरोनाकाळात अन्य साथीच्या आजारांना वेसण; खबरदारी घेतल्यामुळे रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा 

Next

प्रशांत माने

कल्याण : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केडीएमसीसह सर्वच शासकीय यंत्रणांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या केडीएमसी हद्दीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला काहीसा लगाम बसला आहे. तर, दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या अन्य साथीच्या आजारांनाही वेसण घातली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, गॅस्ट्रो या साथींचे रुग्ण अत्यल्प प्रमाणात आढळले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, टायफॉइड, कॉलरा आदी साथींचे आजार बळावतात. त्यामुळे रुग्णालयांमध्ये या आजारांच्या रुग्णांची उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर झुंबड उडते. मागील वर्षी जून ते नोव्हेंबरमध्ये विविध साथींचे २२ हजारांहून अधिक रुग्ण होते. यंदा हे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाळा थांबल्यावर डेंग्यूची लागण होते. ऊन-पावसाचा खेळ व त्यामुळे वातावरणात होणार बदल, यामुळे डेंग्यूचा फैलाव होतो. परंतु, यंदा डेंग्यूचा प्रभाव फारसा जाणवला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आरोग्याची खबरदारी घेण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

इमारतींच्या नव्या बांधकामांच्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्यामुळे डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात. मात्र, यंदा लॉकडाऊनमध्ये बांधकामे बंद असल्याने या आजारांना अटकाव झाल्याकडेही लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी डेंग्यूने १० ते १२ जणांचा मृत्यू होतो. परंतु, यंदा एकाही मृत्यूची नोंद नसल्याची माहिती केडीएमसीच्या साथरोग विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत धूरफवारणी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. कोरोनाच्या सर्वेक्षणात अन्य साथरोगांचीही माहिती घेतली जात होती. तसेच खबरदारीचे आवाहन केले जात होते. नागरिकांनी काळजी घेतल्याने साथीच्या आजारांचे प्रमाण यंदा कमी झाल्याचे डॉ. पानपाटील यांनी सांगितले.

जून ते नोव्हेंबरदरम्यानचे साथीचे रुग्ण
कॉलरा- ००
गॅस्ट्रो- ०८
डायरिया- २८
हगवण- ०२
कावीळ- ४३
टायफाॅइड- १७
डेंग्यू- २०
मलेरिया- ७८

Web Title: Coping with other epidemics during the Corona period; Claims that the number of patients has decreased due to taking precautions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.