कोरोनामुळे नागरिकांनी ऑनलाइन कामे करावी, केडीएमसी आयुक्तांचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:51 AM2021-03-31T05:51:36+5:302021-03-31T05:52:05+5:30
महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच महापालिका मुख्यालय किंवा अन्य प्रभाग कार्यालयांत यावे. अन्यथा ऑनलाइन, ई-मेल आणि मोबाइलचा वापर करून महापालिकेशी संबंधित कामे करावीत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी काढले आहेत.
महापालिका मुख्यालय, प्रभाग कार्यालये या ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळण्याकरिता हे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. अत्यावश्यक कामकाज या आदेशातून वगळण्यात आले आहे. अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी यांना काही अत्यावश्यक काम असल्यास त्यांनी प्रथम मोबाइलवरून संपर्क साधावा. त्यानंतरच प्रभाग अधिकारी कार्यालयात भेटीसाठी यावे. त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही, याची जबाबदारी सुरक्षारक्षक आणि अधिकारी वर्गाची राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याविरोधात सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे आदेशात म्हटले आहे.
नागरिकांनी महापालिकेच्या वेबसाइटवर संबंधित अधिकारी आणि विभागास ई-मेल करावा. अत्यंत तातडीचे टपाल आणि मेसेज ई-मेलद्वारे पाठविले जावेत. महापालिका मुख्यालयात दैनंदिन टपाल आणि इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी सिस्टीम मॅनेजर यांनी नागरी सुविधा केंद्रात टपाल स्वीकारण्याची सुविधा करावी. नागरिकांचा भेटीचा दिवस तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. महापालिकेचा कर आणि अन्य देय रकमा भरण्यासाठी नागरिकांनी डिजिटल सेवेचा वापर करावा. महापालिका कार्यालयात होणाऱ्या बैठका अत्यावश्यक असतील तर त्या आयोजित कराव्यात. अशा बैठकांना महापालिकाबाहेरील अधिकारी, कर्मचारी, खासगी व्यक्तीना आमंत्रित करण्यात येऊ नये, असे आयुक्तांनी म्हटले आहे.