कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 01:42 AM2020-12-02T01:42:03+5:302020-12-02T01:42:15+5:30

तुटीची शक्यता, कोरोनामुळे मनपाची परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोनावर पैसा खर्च झाल्याने मनपाने कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले एप्रिलपासून अदा केलेली नाहीत.

Corona makes KDMC's financial position fragile; Possibility of deficit | कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली 

कोरोनामुळे केडीएमसीची आर्थिक स्थिती नाजूक; कंत्राटदारांची बिले थकली 

Next

मुरलीधर भवार

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे एकमेव लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे सर्व पैसा हा कोरोनावर खर्च झाल्याने मनपाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. मागील नऊ महिन्यांत कोरोनावर मनपाने ७७ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे. आता रुग्ण कमी होऊ लागल्याने या खर्चात कपात सुरू झाली आहे. दरम्यान, या आर्थिक वर्षात मनपाचे उत्पन्न व खर्चात तुटीची शक्यता आहे.

आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाने कंत्राटी व खाजगी तत्त्वावर कोविड केअर सेंटर व रुग्णालये सुरू केली. एका दिवसाला जवळपास ९०० रुग्णांवर एकाच वेळी उपचार करता येईल, अशी यंत्रणा उभारली. कोरोनावर मनपाने आतापर्यंत ७७ कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने १७ कोटी रुपये दिले होते. हा निधी मिळून कोरोनावरील खर्च ९४ कोटींच्या घरात गेला आहे. याशिवाय मनपाने सरकारकडे २१४ कोटी रुपये मागितले आहेत. मात्र, त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही.

कोरोनामुळे मनपाची परिस्थिती नाजूक झाली आहे. कोरोनावर पैसा खर्च झाल्याने मनपाने कंत्राटदारांची जवळपास ५० कोटींची बिले एप्रिलपासून अदा केलेली नाहीत. तसेच मनपाला अमृत योजनेचा १७५ कोटींचा हिस्सा द्यायचा आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या हिश्शाची रक्कमही १०० कोटींच्या आसपास आहे. हा निधी उभारण्याचे आवाहन मनपापुढे आहे.

गणित जुळविण्यासाठी तारेवरची कसरत
केडीएमसीने मालमत्ताकर वसुलीचे ३५० कोटींचे लक्ष्य ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत १९१ कोटी रुपये वसूल केले आहेत. त्यात अभय योजनेतून वसूल झालेली रक्कमही आहे. मनपाचे अन्य विभागाचे उत्पन्न पकडून ४५० कोटींची वसुली होऊ शकते.मनपाचे वार्षिक उत्पन्न हे ८०० कोटी रुपये धरले तरी मार्च २०२१ पर्यंत ३५० कोटींच्या वसुलीचा पल्ला गाठणे अशक्य आहे. दर महिन्याला जीएसटीपोटी १८ कोटी मिळतात. मात्र, मुद्रांक शुल्काचा हिस्सा अद्याप मिळालेला नाही. भरिस भर तीन टक्के मुद्रांक शुल्क कमी केल्याने तेही नुकसान आहे.

Web Title: Corona makes KDMC's financial position fragile; Possibility of deficit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.