Corona Vaccination: लसीकरणासाठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:08 AM2021-04-06T01:08:32+5:302021-04-06T01:08:48+5:30

अशोक समेळ यांनी सपत्नीक घेतली लस

Corona Vaccination: Actors prefer district hospital for vaccination | Corona Vaccination: लसीकरणासाठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती

Corona Vaccination: लसीकरणासाठी अभिनेत्यांची जिल्हा रुग्णालयाला पसंती

googlenewsNext

ठाणे : ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविडच्या काळात सर्वसामान्य रुग्णांसह मराठी अभिनेते, शासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णालयात मिळणाऱ्या आपुलकीच्या वागणुकीमुळे आणि योग्य उपचार पद्धतीमुळे चांगलेच पसंतीस उतरले होते. आता लसीकरणासाठीदेखील सर्वसामान्य नागरिकांसह मध्यमवर्गीय यांच्यापाठोपाठ मराठी अभिनेत्यांनीदेखील हजेरी लावून त्यावरील आपले प्रेम कायम ठेवले आहे. त्यानुसार सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ यांनी सपत्नीक, तर मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन लसीकरण करून घेतले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्हा समान्य रुग्णालयात योग्य उपचार मिळतील का, तेथील कर्मचाऱ्यांकडून नीट वागणूक मिळेल का, अशा अनेक शंका उपस्थित करून नकारात्मक दृष्टीने जिल्हा रुग्णालयाकडे पहिले जात होते. मात्र ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे कोविड १९ रुग्णालयात रूपांतर केले. त्या दिवसापासून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयातील डॉक्टर्सपासून ते सफाई कर्मचाऱ्यांकडून आपुलकीने व माणुसकीच्या नात्याने करण्यात येणारी विचारपूस, त्यांना देण्यात येणारे उत्तम जेवण, नास्ता आदी बाबींची घरच्या प्रकारे काळजी घेत, असल्यामुळे हे रुग्णालय अल्पावधीतच सर्वसामान्यांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी आणि मराठी सिनेअभिनेत्यांच्यादेखील पसंतीस उतरले आहे. त्यात या रुग्णालयात मागील वर्षी अभिजित केळकर या अभिनेत्याने कोरोनाची लागण झाल्यानंतर दाखल होऊन येथील उपचाराचे कौतुक केले. 
दरम्यान, आता याच रुग्णालयात लस घेण्यासाठी कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. 

सुटीच्या दिवशीही मिळाला लसीकरणाला चांगला प्रतिसाद 
आता, जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्रात ४५ वर्षीय व्याधीग्रस्तांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी पसंती देऊन लसीकरण केले. त्यात शनिवारी ३५०, तर रविवारी सुटीच्या दिवशी १४९ जणांनी लसीकरण केले. त्यानंतर सोमवारी ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अशोक समेळ व त्यांच्या पत्नी संजीवनी समेळ यांनी लसीकरण करून घेतले, यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पुत्र, नाटककार संग्राम समेळ व जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवारदेखील उपस्थित होते, तर दुसरीकडे मराठी अभिनेते अभिजित चव्हाण यांनीदेखील सोमवारी जिल्हा रुग्णालयात हजेरी लावून लसीकरण करून घेतले.

काेविड रुग्णालयांतील उपलब्ध बेड
हाॅस्पिटल    एकूण बेड        उपलब्ध
ठाणे
जिल्हा रुग्णालय (शासकीय)    २००        २०
ग्लोबल (टीएमसी)    १०००          १०२
पार्किंग प्लाझा (टीएमसी)    ३००        ००
कौशल्या हाॅस्पिटल (खासगी)    ७०        ००
वेदांत, जीबी, रोड (खासगी)    ७०         ००
मेट्रो पोल     ६०        ००
कल्याण-डोंबिवली
आयकॉन हाॅस्पिटल     ३९        ००
आयुष हाॅस्पिटल     ४०        ०१    
मीरा हाॅस्पिटल     ४०        ००
ऑप्टीलाइफ हाॅस्पिटल    २२        २१
भिवंडी
अल हज शाह मोहम्मद रुग्णालय     १००        २३
स्वराज जननी हॉस्पिटल     १३          ११
लाइफ लाइन वाघमारे हॉस्पिटल                 २५        २१
मढवी हॉस्पिटल    २५          २५ 
खातून बी काझी हॉस्पिटल     १४        ०२
अल मोमीन हॉस्पिटल     ३०          ३०

Web Title: Corona Vaccination: Actors prefer district hospital for vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.