Corona Vaccination: ...तर लसीकरण ठप्प पडू शकते!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:46 AM2021-04-09T00:46:46+5:302021-04-09T00:47:00+5:30
दाेन लाख लसीचे डोसची मागणी : केडीएमसी हद्दीत २२ केंद्रे सुरू
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना लसीकरणासाठी २२ केंद्रे सुरू आहेत. महापालिकेकडे केवळ दोन दिवस पुरेल इतका कोरोना लसीचा साठा आहे. महापालिकेने आणखीन कोरोना लसीची मागणी केली आहे. दोन दिवसांत साठा उपलब्ध न झाल्यास कोरोना लसीकरण ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरणासाठी विविध केंद्रांवर नागरिकांच्या रांगा दिसत आहेत.
महापालिकेची ९ लसीकरण केंद्रे आहेत. खासगी रुग्णालयात १३ ठिकाणी लसीकरणाची केंद्रे सुरू आहेत. महापालिका हद्दीत बुधवारी दिवसभरात सहा हजार १७ जणांना लस देण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर किमान २०० जणांना एका दिवसात लस दिली जात आहे. २०० लसींच्या डोसनुसार दिवसाला चार हजार ४०० डोस पालिकेस लागतात. कालच्या तारखेतील डोसची संख्या पाहता दिवसाला सहा हजार डोस दिले जात आहेत. महापालिकेकडे आज आणि उद्या असे दोनच दिवस पुरेल इतका लसीचा साठा आहे. लसीकरणासाठी ऑनलाइन व ऑफलाइन नोंदणी करायची आहे. ऑनलाइनचे प्रमाण ६० टक्के असून ऑफलाइन लस घेणाऱ्यांची टक्केवारी ४० टक्के आहे. दोन दिवसांचाच साठा असल्याने दोन दिवसांनी लसीकरण बंद होण्याची शक्यता आहे.
आमदार विश्वनाथ भाेईर यांनी घेतली लस
कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी गुरुवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात जाऊन लस घेतली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा टिकेकर उपस्थित होत्या. त्यांच्या देखरेखीखाली आमदारांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर त्यांना निरीक्षण कक्षात काही वेळ थांबवून
ठेवले होते.