Corona Vaccination : कोरोनाची लस घेतल्यानंतर तरुणाला झाला त्रास, भाजपा पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 05:33 PM2021-07-29T17:33:15+5:302021-07-29T17:38:17+5:30
Corona Vaccination : भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली.
कल्याण : डोंबिवली दावडी परिसरात राहणाऱ्या भावेश चकोर या 24 वर्षीय तरुणाने ममता रुग्णालयात लस घेतल्यानंतर त्याला त्रास झाला. त्याला पक्षाघातासारखी लक्षणे दिसून येत आहेत. त्याला महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी पाठविण्यात आले. त्या रिपोर्टमध्ये काय निष्पन्न होते. त्यानंतर ममता रुग्णलयाकडून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान या प्रकरणी भाजपा पदाधिकारी रुग्णालयास प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता प्रवेश द्वारावर पदाधिकाऱ्यांचा रुग्णालय कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला.
भावेशचे वडील रिक्षा चालक आहेत. भावेश हा दावडी येथे राहतो. तो इंजिनिअर आहे. पुणे येथील कंपनीत तो कामाला आहे. त्याने रविवारी ममता रुग्णालयातून कोव्हिशील्ड लस घेतली. त्याला रविवारी संध्याकाळी ताप आला. त्यानंतर त्याचा डोळा आणि तोंड एका बाजूने थरथरू लागल्याचे जाणवू लागले. हा त्रास जास्त झाला असता त्याने रुग्णालय प्रशासनाकडे धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्याला महापालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात एमआरआय काढण्यासाठी पाठविले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावर पुढील उपचार केले जातील असे सांगितले आहे.
यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, भावेशला रविवारी ज्या स्टॉकमधून लस दिली गेली. तीच लस अनेकांना दिली गेली. भावेशला त्रास झाल्याची पहिलीच केस आहे. या प्रकरणी महापालिकेस सूचित केले आहे. भावेशचा एमआरआय रिपोर्ट आल्यावर नक्की काय आहे ते स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. हा प्रकार कळताच भाजपाचे पदाधिकारी नंदू परब आणि मनिषा राणे यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालय प्रशासनाने त्यांना प्रवेश द्वाराजवळच अडविले. त्यामुळे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला.