Corona Vaccine : तुफान राडा! कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 02:44 PM2021-08-28T14:44:52+5:302021-08-28T14:45:29+5:30
Corona Vaccine : लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
कल्याण - कोरोनाची लस (Corona Vaccine) घेण्यासाठी नागरिकांमध्ये चढाओढ पाहावयास मिळत आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी असते. आज होली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. लसीकरण आत्ता हाणामारीवर येऊन पोहचले आहे. हेच या घटनेतून उघड होत आहे.
होली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर दोन तरुणी रांगेत उभ्या होत्या. रांगेत उभे राहण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. त्यानंतर दोघींमध्ये हाणामारी झाली. या दोघींमधील हाणामारी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी सोडविली. तेव्हा कुठे प्रकरण शांत झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी ही घटना आज सकाळी घडली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात केंद्रावरी कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या दोन्ही तरुणींची नावे कळू शकलेली नाहीत.
कल्याण डोंबिवलीत लसीकरण जानेवारी महिन्यापासून सुरु आहे. सगळ्य़ात प्रथम हेल्थ वर्कस, फ्रंट लाईन वर्कर्स, त्यानंतर ज्येष्ठ नागरीक, त्यानंतर तरुणांचे लसीकरण करण्यास टप्प्या टप्प्याने सुरुवात झाली. यापूर्वी कोरोना टेस्ट ही सक्तीची करण्यात आली होती. आत्ता तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता रेल्वे प्रवास आणि मॉल प्रवेशाकरीता सामान्य नागरीकांना दोन डोस घेतल्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांच्याकडून दुसऱ्या डोसकरीता प्रयत्न केले जात आहेत. ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही. त्यांच्याकडून पहिला डोस घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत महापालिकेचे लसीकरण केंद्रे ही अनेकदा बंद ठेवली जातात. त्याचे कारण महापालिकेस सरकारकडून पुरेसे डोस उपलब्ध होत नाहीत.
लसीकरणासाठी नागरीक रात्री 12 वाजल्यापासून रांगेत असतात. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने लसीकरण केले जाते. केंद्रावर टोकन वाटप केले जाते. मात्र लसीकरणाच्या रांगेत उभे असताना नागरीकांचे वाद होत असतात. काहींना रांगेत उभे राहून भोवळ येते. लसीकरण हे नागरीकांच्या जीवावर बेतत आहे. त्याचा परिमाण आज लसीकरणाच्या रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये हाणामारीची घटना घडली आहे. प्रशासनाने या घटनांची गंभीर दखल घेऊन लसीकरणात सातत्य ठेवले पाहिजे. सरकारकडून जास्तीत जास्त लसीचे डोस उपलब्ध करुन नागरीकांच्या लसीकरणाचा प्रक्रिया सुकर केल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकतो अशी अपेक्षा नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.