कोरोनाबाधित रुग्णदुपटीचा कालावधी गेला १३६ दिवसांवर, केडीएमसी हद्द : ११ दिवसांत १५० जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 11:21 AM2021-05-13T11:21:05+5:302021-05-13T11:28:11+5:30
आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत.
कल्याण : केडीएमसी हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने रुग्णदुपटीचा कालावधी १३६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्के आहे. ही समाधानाची बाब असली, तरी मृतांची वाढती संख्या चिंता वाढविणारी आहे. १ ते ११ मेपर्यंत १५० जणांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, मृत्युदरही वाढून १.२४ टक्के झाला आहे.
आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या पाच हजार ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिलमध्ये कोरोनाचे ४१ हजार ५५१ नवे रुग्ण आढळले होते. त्यापैकी ३७ हजार ६२० रुग्ण बरे झाले झाले. मात्र, १७८ रुग्णांचा मृत्यू झाला.
मे महिन्यात ११ दिवसांत सहा हजार ५२५ रुग्ण आढळले, तर १२ हजार ८३४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१० टक्क्यांवर गेले आहे. एप्रिलच्या अखेरीस हे प्रमाण ८६.४५ टक्के, तर रुग्णदुपटीचा कालावधी ४३ पर्यंत घसरला होता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तो ५२ दिवसांवर गेला होता.
दरम्यान, मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत दररोज चार ते पाच रुग्णांचा मृत्यू होत होते, परंतु अखेरच्या आठवड्यात दररोज १० मृत्यू नोंदविले गेले. मे महिन्यापासून यात अधिकच भर पडली आहे.
मृत्युदरात चढ-उतार
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मृत्युदर १.६७ टक्के होता. तिसऱ्या आठवड्यात तो १.२६ टक्के व त्यानंतर तो १.१९ टक्के इतका कमी झाला होता. आता मृत्युदर पुन्हा १.२४ टक्के झाला. मात्र, मृतांची सध्याची दैनंदिन संख्या ही २४ तासांतील नाही, असे मनपाने स्पष्ट केले.