भंगार बेवारस वाहन कारवाईला कोरोनाचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:08 AM2021-04-10T00:08:41+5:302021-04-10T00:08:53+5:30

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीतील विशेष मोहिमेत २८२ वाहने केली जप्त

Corona's brakes on wrecked unmanned vehicle action | भंगार बेवारस वाहन कारवाईला कोरोनाचा ब्रेक

भंगार बेवारस वाहन कारवाईला कोरोनाचा ब्रेक

Next

- प्रशांत माने

कल्याण: रस्ते अडवून अनेक महिने ठाण मांडलेल्या बेवारस आणि भंगार अवस्थेतील वाहनांविरोधात केडीएमसीने शहर आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने विशेष मोहीम हाती घेतली होती. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीत राबविलेल्या मोहिमेत मोठ्या संख्येने वाहने जप्त केली आहेत. परंतु, सद्यस्थितीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने या मोहिमेला पुरती खीळ बसली आहे. मागे जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असून या संदर्भातले परिपत्रक नुकतेच वाहतूक शाखेने जाहीर केले आहे.

रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी व्हावी, लोकांना प्रवास करणे सुलभ जावे या दृष्टिकोनातून रस्त्यालगत आणि रस्त्यावर उभी असलेली आणि शहर सौंदर्यीकरणात बाधा आणणारी बेवारस आणि भंगार स्थितीतील वाहने उचलून ती अन्य ठिकाणी एकत्रितपणे जमा करण्याची मोहीम केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सुरू केली होती. २५ नोव्हेंबरपासून तिला प्रारंभ झाला. 

जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत २८२ वाहने जप्त करण्याची कारवाई प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी केली. केडीएमसीला शहर आणि वाहतूक पोलिसांचेही सहकार्य लाभले. डोंबिवलीतील फ, ग, ह आणि ई प्रभाग क्षेत्रांतर्गत केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाहने मनपाच्या खंबाळपाडा येथील वाहनतळावर तर कल्याणमधील अ, ब, क, ड, आय, जे या प्रभाग क्षेत्रात जप्त केलेली वाहने वसंत व्हॅली येथील डेपोमध्ये ठेवली आहेत. या बेवारस आणि भंगार वाहनांमध्ये दुचाकी, चारचाकी, हातगाड्या, स्टिल वाहतूक हातगाड्या, थ्री व्हीलर टेम्पो यांचा समावेश आहे. हायड्रा आणि डम्परच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली. 

दरम्यान फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना संक्रमणाचा उद्रेक सुरू झाल्याने हा प्रादुर्भाव रोखण्यात मनपा यंत्रणा व्यस्त झाली आहे. त्यामुळे तेव्हापासून या मोहिमेला ब्रेक लागला आहे. यामुळे वाहने कधी उचलली जाणार हा खरा प्रश्न आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया
बेवारस आणि धूळखात भंगार अवस्थेत पडलेल्या वाहनांमुळे परिसराचे विद्रुपीकरण होतेच त्याचबरोबर या गाड्यांच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात कचरा साचला जात असल्याने अस्वच्छता दिसून येते. ही वाहने धुळीने भरलेली असतात. त्यामुळे एकप्रकारे महापालिकेकडून शहरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानालाही कुठेतरी बाधा पोहोचते त्यामुळे शहरात अधूनमधून त्यासंदर्भात कारवाई होणे गरजेचे आहे 
    - समिता कदम, कल्याण (पश्चिम)

कल्याण डोंबिवलीतील बहुतांश रस्ते हे अरुंद आहेत. केडीएमसीने मध्यंतरी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी भंगार अवस्थेतील वाहने जप्त केल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ही मोहीम बंद असली तरी पुन्हा रस्त्यांवर अशी वाहने धूळखात पडून कोंडी होणार नाही याची दक्षता महापालिकेसह वाहतूक पोलिसांनीही घ्यावी.    - स्वप्निल सावंत, डोंबिवली,पूर्व

कोरोनामुळे सद्यस्थितीला बंद असलेली मोहीम पुन्हा केव्हा सुरू होईल याची खात्री नाही. पण वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या आणि अनेक महिने रस्त्यात जागा अडवून पादचाऱ्यांनाही अडथळा ठरणाऱ्या भंगार आणि बेवारस वाहनांवर कारवाई ही सुरू राहिलीच पाहिजे. या सततच्या कारवाईमुळे निश्चितच सुधारणा होईल यात शंका नाही.
    - राकेश जाधव, डोंबिवली पश्चिम

१६ वाहनांचा होणार लिलाव
डोंबिवलीच्या हद्दीत सार्वजनिक रोडवर बेवारस स्थितीत धूळखात एकूण १६ वाहने मिळून आली. ती ज्यांची आहेत त्यांनी घेऊन जाण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले होते. परंतु, वाहने सोडवण्यास कोणी आले नाही. संबंधित वाहने उन, वारा, पाऊस व हवेतील प्रदूषणामुळे गंजून व सडून पूर्णपणे निकामी झालेली आहेत. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया राबवून त्यांचा लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव शुक्रवारी १६ एप्रिलला सकाळी ११ वाजता खंबाळपाडा आगारात होणार आहे. लिलावामध्ये ज्या व्यावसायिकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांना त्यांचेकडील परवाना व संबंधित कागदपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
    - उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक     डोंबिवली शाखा

Web Title: Corona's brakes on wrecked unmanned vehicle action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.