coronavirus: कोरोना रुग्णांचा मृत्युदर केडीएमसी आणणार शून्यावर,आयुक्तांची डॉक्टरांसाेबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 11:49 PM2020-12-05T23:49:39+5:302020-12-05T23:50:17+5:30
coronavirus News : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत.
कल्याण - केडीएमसी हद्दीतील कोरोना रुग्णांचा मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांची बैठक घेतली.
कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी मृत्युदर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. मिशन बिगेनअंतर्गत सगळे व्यवहार अनलॉकमध्ये सुरू झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र नागरिकांची वर्दळ वाढल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचबरोबर, १५ डिसेंबरपासून लोकल सर्वांसाठी सुरू करण्यासाठी एक बैठक राज्य सरकारच्या पातळीवर घेतली जाणार आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्यासाठी मनपाची काय उपाययोजना आहे, याबाबत चर्चा करण्यासाठी सूर्यवंशी यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या दालनात डॉक्टरांची एक बैठक घेतली. यावेळी इंडियन मेडिकल असोसिशएनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, ‘निमा’च्या अध्यक्षा डॉ.गायत्री कुलाली, ‘धारपा’च्या अध्यक्षा डॉ.भावना ठक्कर, आयएमए डोंबिवलीचे अध्यक्ष डॉ. सुनीत उपासनी, डोंबिवलीचे सेक्रेटरी डॉ.हेमंत पाटील, निमा डोंबिवलीचे सेक्रेटरी डॉ.माधुरी बहीरट, होमिओपॅथीक डॉक्टर फेडरेशनचे अध्यक्ष जयेश राठोड, निमाचे कल्याणचे प्रेसिडंट कल्याण डॉ.अनिल पाटील, मनपाच्या साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहासिनी बडेकर, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम टिके उपस्थित होते.
मनपा सध्या दररोज अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या करत असून, त्यांचे प्रमाण १,७०० ते दोन हजारांदरम्यान आहे. रेल्वे स्थानकावरही चाचणी सुरू आहे, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
छोटे दुकानदार, भाजीवाले, किराणा दुकानदार, बांधकाम कामगार, हॉटेलमधील कामगार यांना ताप आल्यास त्वरित त्यांची कोरोना चाचणी करावी, तसेच नॉनकोविड रुग्णालयात कोविड रुग्णास उपचारासाठी दाखल केल्यास संबंधित रुग्णालयाच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे रुग्णालयांची जबाबदारी वाढली आहे.
‘शीतगृह, लशीची माहिती संकलित करा’
कोविडचे संभाव्य लसीकरण लक्षात घेऊन मनपा हद्दीतील शीतगृहे शोधून ठेवावीत, तसेच लशीची माहिती संकलित करून ठेवावी, असे आदेश वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांना आयुक्तांनी दिली आहेत. अजून कोविडचे संकट टळलेले नाही. त्यामुळे यंत्रणा सज्ज ठेवून दुसरी लाट येणार नाही, अशी अपेक्षा करू या, असे आवाहन आयुक्तांनी डॉक्टरांना केले.