Coronavirus live news: बार, रेस्टाॅरंट कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश; KDMC आयुक्तांनी दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:25 AM2021-03-25T00:25:29+5:302021-03-25T00:25:50+5:30
कल्याण डोंबिवलीत बुधवारी तब्बल ८८१ काेरोना रुग्ण आढळले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बार, रेस्टाॅरंट आणि हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी येत्या सात दिवसांत करून त्याचा अहवाल मनपाने दिलेल्या मेल आयडीवर पाठवावा, असे आदेश मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हॉटेल मालक-चालकांना दिले आहेत.
मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने ११ मार्चपासून काही निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतर मिशन ‘बिगेन अगेन्स’चे आदेशही आयुक्तांनी काढले होते. त्यात कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले होते. बार, रेस्टाॅरंट आणि हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा आहे. तेथे मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असल्याने त्यांचा संपर्क कर्मचाऱ्यांशी येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या मेल आयडीवर आस्थापना चालक-मालकांनी पाठवावा, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
मनपाच्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टाॅरंट, बार आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी केली आहे की नाही, याची खातरजमा करावी. ज्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली नसेल, तर त्याच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
कल्याण-डोंबिवलीत ८८१ नव्या रुग्णांची भर
कल्याण डोंबिवलीत बुधवारी तब्बल ८८१ काेरोना रुग्ण आढळले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीला ५,९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ७२,८८१ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६५,६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १,२३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेत २७१, डोंबिवली पूर्वेत २६३ तर कल्याण पूर्वेत १४९ रुग्ण सापडले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही १४४ रुग्ण आढळले.