Coronavirus : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 21 लाखांहुन अधिक दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 07:08 PM2021-05-05T19:08:57+5:302021-05-05T19:09:37+5:30
KDMC News : एप्रिल महिन्यात मास्क न लावणा-या व्यक्तींकडून केडीएमसी प्रशासनाने 21 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.
कल्याण - विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पालिका प्रशासन कारवाईचा बडगा उचलत असली तरी नागरिकांची बेशिस्ती काही थांबत नसल्याचेच चित्र सध्या दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात मास्क न लावणा-या व्यक्तींकडून केडीएमसी प्रशासनाने 21 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून 2 हजरांपर्यँत गेली होती. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. असे असूनही कल्याण डोंबिवलीमधील स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे अनेक नागरिक किमान मास्क परिधान करण्याची तसदी घेत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. एप्रिल महिन्यात पालिकेने मास्क न घालणा-या 4 हजार 342 व्यक्तींकडून 21 लाख 71हजार इतका दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेक नागरिक मास्क परिधान न करता स्वतः चा व इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत. त्यामुळे परिस्थिती यापेक्षाही भयंकर झाल्यावरच नागरिकांची बेशिस्ती कमी होईल की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.