CoronaVirus News: केडीएमसी क्षेत्रात लवकरच 1136 बेड होणार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:48 PM2021-04-08T23:48:41+5:302021-04-08T23:48:55+5:30
मुख्य वैद्यकीय अधिकारी : टिटवाळा कोविड रुग्णालय सुरू
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. आजच्या घडीला ९० टक्के बेड हे फुल झाले आहेत. दुसरीकडे बेड वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आजपासून टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा येथे ६० बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. अन्य ठिकाणी कोविड सेंटर व रुग्णालये सुरू करण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले की, टिटवाळा कोविड रुग्णालयात ६० बेड आहे. त्यापैकी नऊ बेड आयसीयू आणि ५१ बेड हे ऑक्सिजनचे आहेत. महापालिका शहाड येथील साई निर्वाणा इमारतीत कोविड सेंटर सुरू करणार आहे. त्या ठिकाणी ६३६ बेडची सुविधा आहे. हे सेंटर येत्या दोन दिवसांत सुरू होईल. त्याचबरोबर गांधारे येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात २०० बेडचे सेंटर दोन दिवसांत सुरू केले जाईल. एनआरसी शाळेत ३०० बेडची सुविधा असलेले कोविड सेंटर आठवडाभरात सुरू केले जाईल. येत्या आठवडाभरात ११३६ बेडची सुविधा रुग्णांच्या उपचारांसाठी उपलब्ध होणार आहे.
पालिकेचे भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा, डोंबिवली क्रीडा संकुल, डोंबिवली सावळाराम महाराज क्रीडासंकुल, टेनिस कोर्ट, कल्याणमध्ये आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर, डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे कोविड सेंटर सुरू आहे. त्या ठिकाणी तळमजल्यावर १०० बेडची अतिरिक्त सेवा दिली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नाही. त्यांच्यासाठी १०० पैकी ५० स्टेप डाऊन बेडची साेय केली आहे, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.
खासगी रुग्णालयांना सूचना
महापालिकेच्या रुग्णालयात बेड खाली होताच तो अन्य रुग्णाला उपलब्ध करून दिला जातो. तसेच खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेची माहिती त्यांनी डॅशबोर्डवर द्यावी याची सक्ती केली आहे. पालिकेच्या वेबसाइटवरही बेडचा डॅशबोर्डची माहिती दिली जात आहे. काही रुग्णालये ही माहिती अपडेट करत नसल्याची बाबही निदर्शनास आली आहे. त्यांनाही सूचित करून बेड उपलब्धतेसंबंधी अपडेट देण्यास सांगण्यात आले आहे.