CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:57 AM2021-04-08T00:57:44+5:302021-04-08T00:57:58+5:30

कल्याण पश्चिमेसह डोंबिवली पूर्व हॉटस्पॉट : रुग्ण दुपटीचा कालावधी ४३ दिवसांवर

CoronaVirus News: 22 thousand 168 patients found in 36 days in Kalyan-Dombivali | CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवलीत 36 दिवसांत आढळले तब्बल 22 हजार 168 रुग्ण

Next

- प्रशांत माने

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाने कहर केला असून, १ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत आढळलेल्या रुग्णांचा आढावा घेता गेल्या ३६ दिवसांत तब्बल २२ हजार १६८ रुग्ण आढळले आहेत. तसेच ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत कल्याण पश्चिममध्ये सात हजार ८७६ तर डोंबिवली पूर्वमध्ये सात हजार ७७४ रुग्ण आढळल्याने हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत.

मनपाच्या हद्दीत कोरोना रुग्णसंख्या कमालीची वाढत असून दररोज आढळणारी रुग्णसंख्या आजमितीला तेराशे ते सतराशेच्या दरम्यान आहे. मंगळवारी एक हजार ३०९ रुग्णांची भर पडल्याने आजवरची कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८६ हजार ८०६ पर्यंत पोहोचली आहे. यातील ७४ हजार १८२ रुग्ण उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २७५ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्वेत रुग्णांचा वाढता आलेख चिंताजनक आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या दोन विभागांमध्ये दररोज ४८ ते ५८ च्या आसपास आढळणारी रुग्णांची संख्या आजमितीला ५०० ते ६०० च्या वर गेली आहे. ४ एप्रिलला डोंबिवली पूर्वेत ५१० तर कल्याण पश्चिमेत ६५० रुग्ण आढळले आहेत. गेल्या ३६ दिवसांतील रुग्णांची आकडेवारी पाहता डोंबिवली पूर्वेत सात हजार ७७४ तर कल्याण पश्चिमेत सात हजार ८७६ इतकी आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील परिस्थिती फारशी आलबेल आहे, असे नाही. त्या ठिकाणीही तीन हजार ३० डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेत तीन हजार ५४४ जणांना बाधा झाली आहे. यापाठोपाठ मांडा-टिटवाळा भागात एक हजार ६९, मोहना परिसरात ३४० तर पिसवलीत २४ रुग्ण आढळून आले आहेत. मनपा हद्दीतील रुग्णसंख्येत दिवसागणिक भरमसाट वाढ होत असल्याने रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे मुश्कील झाले असून, आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे.

महापालिका हद्दीत मृत्यूदर १.६७ , बरे हाेण्याचे प्रमाण ८६ टक्के
कोरोनाच्या पहिल्या लाटेत १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. त्या वेळी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ९ ते १० दिवसांवर आला होता. दरम्यान, मध्यंतरीच्या काळात हा कालावधी २१० ते २६० दिवसांवर गेला होता. परंतु, सद्य:स्थितीला रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी आता पुन्हा ४३ दिवसांवर आला आहे. कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण पाहता सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीतील मृत्युदर हा १.६७ टक्के इतका आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के इतके आहे.

कोरोना चाचण्यांमध्ये वाढ
एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. मंगळवारी साडेपाच हजारांच्या आसपास नागरिकांची कोरोना चाचणी केल्याची माहिती मनपाच्या साथरोग विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.

Web Title: CoronaVirus News: 22 thousand 168 patients found in 36 days in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.