CoronaVirus News : कोरोना संकट काळात अतिमद्यपान धोक्याचे!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 07:23 PM2021-04-02T19:23:54+5:302021-04-02T19:24:28+5:30
CoronaVirus News: गेल्या अनेक वर्षांपासून जी व्यक्ती मद्याचे अतिसेवन करत आहे. अशा व्यक्तीने साथीच्या आजारातही अतिसेवन केले तर अशा व्यक्तीना कोरोनाचा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता आहे.
- मयुरी चव्हाण
कल्याण : गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात मद्यपान करण्याकडे नागरिकांचा कल वाढला होता. आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पुन्हा अनेक ठिकाणी 50 टक्के उपस्थितीचा नियम आखण्यात आला आहे. त्यामुळे बहुतांश नागरिकांना घरी व्यतित करायला अधिक वेळ मिळत असल्याने पुन्हा मद्यपींचा दारू पिण्याकडे अधिक कल वाढला आहे. मात्र अतिमद्यपान केल्याने त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होऊन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. (CoronaVirus News: Alcohol Dangerous in Corona Crisis!)
गेल्या अनेक वर्षांपासून जी व्यक्ती मद्याचे अतिसेवन करत आहे. अशा व्यक्तीने साथीच्या आजारातही अतिसेवन केले तर अशा व्यक्तीना कोरोनाचा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता आहे. साथीच्या आजारात मद्यपान करणे हे धोकादायक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले आहे.
रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायची असेल तर दारूपासून दूर रहा असे जागतिक आरोग्य संघटनेनेही म्हटले आहे. कोरोना काळात मद्यसेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा आपले मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि तात्पुरता तणाव दूर करण्यासाठी लोक दारूचा आधार घेताना दिसत आहेत. त्यात दारूसाठी उडालेली झुंबड, लागलेल्या रांगा पाहून जास्त दारू पिणे योग्य आहे असे ठरवून नेहमी पेक्षा जास्त मद्याचे सेवन करने लोक योग्य असल्याचे ठरवू लागले आहे, असे मानसोपचातज्ञ सांगतात.
अतिमद्यपान केल्याने प्रथम लिव्हरवर परिणाम होतो. लिव्हरच्या जवळच फुफ्फुसं असल्याने त्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दारू नियमित पिणा-यांची फुफ्फुसंही योग्य रीतीने काम करत नसतात. त्यात कोरोनाचा संसर्ग झाला तर फुफ्फुसच या रोगाच्या पहिल्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचे दिसून आले आहे.
दारूमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन रोग सहजपणे अशा व्यक्तीवर हल्ला करतात,अशा व्यक्तींना श्वसनाचाही त्रास होतो. कोव्हिड 19 चा गंभीर टप्पा म्हणजे एआरडीएस या टप्प्यात दोन्ही फुफ्फुस निकामी होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होतो. या गंभीर अवस्थेला अतिमद्यपी बळी पडण्याची शक्यता जास्त असल्याने मद्यप्रेमींना आपल्या दारू पिण्याच्या अतिउत्साही सवयीवर आता आळा घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
सध्या अनेक ग्राहक छोटेखानी पार्टी करून काहीसा ताण हलका करण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत मद्याची मागणी थोडी कमी झाली होती. मात्र फेब्रुवारीच्या अखेरपासून पुन्हा मागणी वाढली आहे. शनिवार रविवार सह बुधवारी आणि शुक्रवारी मद्याला जास्त मागणी आहे असे एका वाईन शॉप मालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
वर्षानुवर्ष दारूचे सेवन करणारी व्यक्ती लॉकडाऊन काळात अतिमद्यपान करत असेल तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कारण दारूच्या सततच्या प्रभावाने अशा व्यक्ती योग्य आहार घेत नाही. तसेच दारू पिणा-यांची श्वसनक्रिया ही अगोदरच उथळ असते. उथळ श्वासामुळे त्यांच्या फुफ़फसाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसतो. साथीच्या आजारात अतिमद्यपान धोक्याचे आहे.
- डॉ आर. व्ही . कदम, निवृत्त सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, ठाणे विभाग.