CoronaVirus News: मुंबईच्या उंबरठ्यावर आणखी एक मोठं संकट; दोन मृत्यूंमुळे एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 09:03 PM2021-05-11T21:03:07+5:302021-05-11T21:05:50+5:30
CoronaVirus News: कल्याण डोंबिवलीमध्ये म्युकरमायकोसिसचे दोन बळी; केडीएमसी प्रशासनाचा दुजोरा, मात्र रुग्णालयाची चुप्पी
- मयुरी चव्हाण
कल्याण: कोरोना आजाराबाबत नवीन लक्षण समोर येत असून यामध्ये आता कोरोनाग्रस्तांना म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराला सामोरं जावं लागत आहे. राज्यात आतापर्यंत या आजारामुळे 8 लोकांचा बळी गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच दिली आहे. कल्याण डोंबिवली परिसरातदेखील म्युकरमायकोसिसमुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी एक रुग्ण केडीएमसी हद्दीतील असून दुसरा रुग्ण हा कल्याण ग्रामीण परिसरातील आहे. या वृत्तास कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानेदेखील दुजोरा दिला आहे. डोंबिवलीमधील एका खाजगी रुग्णालयात या दोंघांवर उपचार सुरू होते. मात्र यासंबंधी खाजगी रुग्णालयाने बोलण्यास टाळाटाळ केली आहे.
VIDEO: कहाँ से आते है ये लोग? बंद शटर उघडताच लागली रांग; पोलिसांनी मारला डोक्यावर हात
कल्याण डोंबिवलीच्या शहरी आणि ग्रामीण भागामध्येही या आजाराने शिरकाव केल्याचे दिसून येते. कोरोनामुक्त झाल्यानंतर डायबेटिस असलेल्या रूग्णांना हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीच्या एम्स रुग्णालयात या दोन्ही मृत व्यक्तींवर उपचार सुरू होते. दोघेही पुरुष असून त्यांचे वय अनुक्रमे ३८ व ६९ अशी आहेत. एम्स रुग्णालयात म्युकरमायकोसिस आजाराने ग्रस्त असलेल्या एकूण सहा व्यक्तींवर उपचार सुरु असल्याची माहिती केडीएमसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. तसेच रुग्णालयाने पाठवलेल्या अहवालातील डेथ सर्टिफिकेटवर मृत्यूचे कारण म्युकरमायकोसिस असे नमूद केल्याचेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.
...तर देशात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती; शास्त्रज्ञ चिंतेत
यासंदर्भात एम्स रुग्णालय प्रशासनाशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच नाही तर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हॉस्पिटलच्या आवारात गेले असता यावर कोणतेही भाष्य करण्यास रुग्णालय प्रशासन तयार नव्हते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येत आहे. एम्स हॉस्पिटल येथे 6 रूग्ण म्युकरमायकोसिस आजारावर उपचार घेत असून दोघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एक रुग्ण कल्याण डोंबिवली परिसरातील असून दुसरा ग्रामीण भागातील आहे. डायबेटीसच्या रुग्णांना या आजराचा संसर्ग लवकर होऊ शकतो त्यामुळे अशा रूग्णांनी शुगर लेव्हल मेंटेन करणं आवश्यक आहे. कोणीही घाबरून जाऊ नये. कोरोनसोबत या आजारावरदेखील उपचार केले जाणार आहे.
- डॉ अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी
सर्वेक्षण करणं गरजेचं
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असणारं कोविड सेंटर आणि व खाजगी कोविड रुग्णालयात म्युकरमायकोसिस या आजाराचे एकूण किती रुग्ण दाखल आहेत त्यांच्यावर कसे आणि काय उपचार केले जात आहेत, याची माहिती केडीएमसी प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाला विचारणा केली असता अद्याप रुग्णालयांकडून यासंदर्भातील अहवाल प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता खाजगी रुग्णालयांना कोरोना संदर्भातील सर्व माहिती वेळेत देण्यासाठी प्रशासनाने कडक शब्दांत समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.