coronavirus: एकाच व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह अन् निगेटिव्ह, दोन अहवालांमुळे झाला संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:03 AM2021-04-01T03:03:20+5:302021-04-01T03:03:53+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने या वेगवेगळ्या अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना चाचणीसाठी गेलेल्या महिलेचा एक अहवाल पॉझिटिव्ह तर दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने या वेगवेगळ्या अहवालांमुळे कोरोनाच्या चाचणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, योग्य प्रकारे स्वॅब घेतला न गेल्याने दुसरा रिपोर्ट अहवाल निगेटिव्ह आला असावा, पहिला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित रुग्ण कोरोनाबाधितच आहे. तिने विलगीकरण होऊन उपचार घ्यावेत, असे केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे केडीएमसीकडून कोरोना चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. डोंबिवली पूर्वेतील आजदे आरोग्य केंद्रांतर्गत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेने कोरोनाची लक्षणे असल्याने शनिवारी मनपाच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केली यात त्यांचा अहवाल आला. मात्र, त्यांनी त्याच वेळी मंजुनाथ आरोग्य केंद्रातही कोरोनाची चाचणी केली. यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. हे दोन्ही अहवाल सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाचणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. मात्र रुग्णांनी पुन्हापुन्हा चाचण्या केल्यापेक्षा तत्काळ विलगीकरण होऊन कोरोनाचे संक्रमण थांबवावे असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पाॅझिटिव्ह अहवाल खरा
स्वॅब योग्य प्रकारे न घेतल्याने अहवाल निगेटिव्ह आला असावा. परंतु, पॉझिटिव्ह आल्यावर पुन्हा चाचणी करणे कितपत योग्य आहे? ॲण्टीजेन चाचणी निगेटिव्ह येते, तेव्हा आरटीपीसीआर करण्यास सांगतो. निगेटिव्ह अहवाल खोटा असू शकतो, परंतु पॉझिटिव्ह येतो तेव्हा तो खराच असतो, असे केडीएमसीच्या डॉ. प्रतिभा पानपाटील म्हणाल्या.