Coronavirus : "या" कारणामुळे कल्याण-डोंबिवलीत घटली रुग्णसंख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 04:14 PM2021-05-04T16:14:37+5:302021-05-04T16:15:07+5:30
Coronavirus in KDMC : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे शहरात सध्या सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
- मयुरी चव्हाण
कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे शहरात सध्या सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक नागरिक मास्क लावत नव्हते. मात्र या लाटेत कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याने मास्क लावण्याबाबत अनेक स्तरातून जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे मुख्यत्वे मास्क लावण्या-यांची संख्या देखील वाढली. यामुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
अन्य ठिकाणी कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत असताना कल्याण डोंबिवली शहरात मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर होती. त्यामुळे काहीसे चिंतेचे वातावरण होते. गेल्या काही दिवसात रूग्णसंख्येत घट होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. कडक निर्बंध लागू केल्यामुळे याचा थेट परिणाम म्हणजे रुग्णांची आकडेवारी कमी झाली. 80 टक्के लोकांनी नियम पाळले. मास्क घालण्याचे प्रमाण देखील वाढले. मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्यानं कल्याण डोंबिवलीकरांनी देखील आपली योग्य ती काळजी घेतली. तसेच कोरोनाची सौम्य लक्षण जाणवताच बहुसंख्य लोक तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरी बरे झाले. महापालिकेने काँटॅक्ट ट्रेसिंग देखील वाढवले. या सर्व गोष्टींमुळे रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली असे मत आयएमएचे कल्याणचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी व्यक्त केले.
दुकान बंद असल्यामुळे नागरिकांनी देखील घरीच राहण पसंत केलं. त्यामुळे बाजारात होणाऱ्या गर्दीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवणं शक्य झाल्याचे दिसून येते.
तर .... हे सुद्धा दिवस जातील
रुग्णसंख्या सध्या कमी झाली असली तरी भविष्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज असल्याच डॉ पाटील यांनी स्पष्ट केले आहे. इतर देशात लसीकरणाचा वेग वाढल्यानं तेथील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ही अवघी 1 ते 2 टक्क्यांवर आली आहे. आपल्याकडे लसीकरणाचा वेग वाढला तर हे चित्र आपल्याकडेही दिसू शकते असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मात्र सध्या कल्याण डोंबिवलीत लसींचा तुटवडा असल्याने वारंवार लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लसींचा साठा, वितरण आणि वेग याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्या
तारीख रुग्णसंख्या
3 मेे - 498
2 मे - 729
1 मे -822
30 एप्रिल- 819
29 एप्रिल-835
28 एप्रिल - 1091
27 एप्रिल- 749